पुणे : ‘कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित तंत्रज्ञानाच्या युगात भारतीय ज्ञान परंपरेतील रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, शल्यचिकित्सा, वैद्यकीय, स्थापत्य अभियांत्रिकी या विषयांचे सखोल अध्यापन व्हावे, यासाठी ‘गुरुसेतू’ पोर्टल विकसित करण्यात येत आहे. लवकरच नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार शिक्षण क्षेत्रात याचा अवलंब केला जाईल,’ अशी माहिती राष्ट्रीय शिक्षण तंत्रज्ञान मंचाचे (एनईटीएफ) अध्यक्ष प्रा. डाॅ. अनिल सहस्रबुद्धे यांनी शनिवारी दिली.

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ‘तंत्रज्ञान व डिजिटल समावेशनाद्वारे विकसित भारताकडे’ या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानात डॉ. सहस्रबुद्धे बोलत होते. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. गजानन एकबोटे, मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या प्राचार्य डॉ. कल्याणी जोशी, सचिव प्रा. श्यामकांत देशमुख, सहसचिव प्रा. डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्सच्या प्राचार्य डॉ. निवेदिता एकबोटे आदी या वेळी उपस्थित होते.

डाॅ. सहस्रबुद्धे म्हणाले, ‘प्राचीन भारतातील प्रत्येक विषयाचा इतिहास काय होता, या विषयांवर कसा अभ्यास झाला, विविध विषयांमध्ये भारतीय अभ्यासकांनी केलेले काम, विषयाची मांडणी, अध्ययन आणि अध्यापन सोप्या भाषेत समजाविण्यासाठी ‘गुरुसेतू’ हे डिजिटल पोर्टल सुरू करण्यात येणार आहे. शिक्षण क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा सर्वाधिक अवलंब करणे काळाची गरज असल्याने नवनवीन धोरणांची अंमलबजावणी महत्त्वाची आहे.’

‘यंदा अभियांत्रिकीची प्रवेशप्रक्रिया दीड महिना चालली. प्रवेश उशिरा झाल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. खासगी विद्यापीठांत प्रवेशप्रक्रिया पूर्ण होऊन पहिली सत्र परीक्षादेखील होईल. त्यामुळे प्रवेशप्रक्रिया लवकर होण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरून ठोस पावले उचलली.

‘एआय’ला मर्य़ादा

‘कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) शिक्षण क्षेत्रात मोठा प्रभाव पडत असला, तरी त्याला मर्यादा आहेत. दर पाच वर्षांनी अभ्यासक्रमात होणारे बदल ‘एआय’ तंत्रज्ञान नाही, तर शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ घडवत आहेत. ‘एआय’ तंत्रज्ञानात कितीही बदल झाले, तरी मोह, माया, मत्सर, दंभ, प्रेम ही मानवी मूल्ये, संवेदना आदी शिकविले जाणार नाही. या सीमा ओळखून काळानुरूप शिक्षण अवगत असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय क्षेत्रात एखादी पदवी घेतली म्हणजे जग जिंकले, खूप शिकलो असे वाटू देऊ नये,’ असा सल्ला डाॅ. अनिल सहस्रबुद्धे यांनी विद्यार्थ्यांना दिला.