पुणे : किराणा दुकान, पानपट्टीत गुटखा विक्री करणाऱ्या पाचजणांना आंबेगाव पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ४९ हजार ९०० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. राहुल प्रकाश संचेती (वय ३२, रा. शंभुराजे मित्र मंडळाजवळ, आंबेगाव), प्रमोद प्रकाश संचेती (वय ३६, रा. आंबेगाव), रवींद्र राजकुमार वाकडे (वय २६, रा. संतोषनगर, कात्रज), सुनील दगडु सुरवसे (वय २४, रा. वडगाव) आणि प्रशांत बच्चा कुलाल (वय ४१, रा. आंबेगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस कर्मचारी अजय कामठे यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राज्य शासनाने गुटखा विक्रीवर बंदी घातली आहे. आंबेगाव, कात्रज, वडगाव भागातील दुकाने, तसेच पानपट्टीत गुटखा विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने चार ठिकाणी छापा टाकला. त्यांच्याकडून गुटखा जप्त करण्यात आला.

पोलीस उपायुक्त स्मार्तन पाटील, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन चोरमोले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोहन कळमकर, शैलेंद्र साठे, हनुमंत मासाळ, चेतन गोरे, बाबासाहेब पाटील, निलेश जमदाडे, अजय कामठे, हरीश गायकवाड, धनाजी धोत्रे, सचिन गाडे यांनी ही कारवाई केली.