पुणे : वाहनाचा हाॅर्न वाजविल्याने झालेल्या वादातून एकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना हडपसर भागात घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी रिक्षाचालकासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत रमेशचंद्र रतीपाल वर्मा (वय ५४, रा. पाताळगंगा औद्योगिक वसाहत, रसायनी, जि. रायगड) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेशचंद्र वर्मा हे सोमवारी मध्यरात्री मोटारीतून पुणे-सोलापूर रस्त्याने निघाले होते. द्राक्ष संशोधन केंद्राजवळ त्यांनी एका रिक्षाला पाहून हाॅर्न वाजविला. या कारणावरून रिक्षाचालकासह साथीदारांनी वर्मा यांना शिवीगाळ केली. त्यांना काठीने, तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आणि आरोपी पसार झाले. पोलीस हवालदार टेंगले तपास करत आहेत.