राज्यातील २१ लाख शेतकऱ्यांचा सहभाग

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : कृषी वीजबिलांच्या थकबाकीत ५० टक्के माफी देण्याच्या योजनेत राज्यात आतापर्यंत २१ लाख ८० हजार शेतकऱ्यांनी सहभाग घेतला असून, त्यांना वीजबिल कोरे करण्याची संधी मिळू शकणार आहे. आजवर चार लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी त्यांचे वीजबिल कोरे केले आहे. निम्म्या थकबाकीच्या माफीची ही योजना ३१ मार्चपर्यंत राबविण्यात येणार आहे. 

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० नुसार कृषिपंपाच्या वर्षांनुवर्ष थकीत असलेल्या वीजबिलांमधून थकबाकीमुक्तीच्या योजनेत ४४ लाख ५० हजार शेतकऱ्यांच्या मूळ थकबाकीमधील व्याज आणि विलंब आकारातील सूट तसेच निर्लेखनाचे एकूण १५ हजार ९७ कोटी रुपये माफ करण्यात आले आहेत. आतापर्यंत वीजबिलांच्या दुरुस्तीमधून ३०० कोटी २४ लाख रुपयांचे समायोजन करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांकडे वीजबिलांपोटी ३० हजार ७०५ कोटी रुपयांची सुधारित थकबाकी आहे. त्यापैकी ५० टक्के थकबाकीचा ३१ मार्च २०२२ पर्यंत भरणा केल्यास उर्वरित ५० टक्के म्हणजे तब्बल १५ हजार ३५२ कोटी ५० लाख रुपयांची माफी शेतकऱ्यांना मिळणार आहे.

योजनेत २३ फेब्रुवारीपर्यंत २१ लाख ७९ हजार ८१६ शेतकऱ्यांनी चालू वीजबिल आणि थकबाकीची काही रक्कम भरून सहभाग घेतला आहे. त्यांना आतापर्यंत व्याज, दंड, निर्लेखनासह भरलेल्या रकमेएवढीच एकूण सहा हजार ७६९ कोटी ५० लाख रुपयांची सवलत मिळाली आहे. या शेतकऱ्यांनी सुधारित थकबाकीच्या ५० टक्के रकमेमधील शिल्लक रक्कम येत्या ३१ मार्चपर्यंत भरल्यास त्यांचीही उर्वरित ५० टक्के थकबाकी माफ होणार आहे.

पुणे विभागात सर्वाधिक प्रतिसाद

कृषी वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीच्या योजनेत पुणे प्रादेशिक विभागामध्ये ७ लाख २७ हजार ६३७ शेतकरी सहभागी झाले असून, त्यातील २ लाख ९ हजार ६३८ शेतकरी थकबाकीमुक्त झाले आहेत. कोकण प्रादेशिक विभागात सहभागी ६ लाख १९ हजार २८५ पैकी १ लाख ९ हजार ५९४ शेतकरी थकबाकीमुक्त झाले आहेत.

नागपूर प्रादेशिक विभागात ३ लाख ४३ हजार २०७ शेतकरी सहभागी झाले असून ६० हजार ९३८ थकबाकीमुक्त तर औरंगाबाद प्रादेशिक विभागात सहभागी ४ लाख ८९ हजार ६८७ पैकी १७ हजार २९ शेतकरी थकबाकीमुक्त झाले आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Half electricity bill waiver scheme participation farmers ysh
First published on: 24-02-2022 at 00:02 IST