scorecardresearch

पुणे : संविधानाचा अपमान करणाऱ्यांकडून हर घर तिरंगा अभियान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आरोप

कॅम्प परिसरातील कॅपिटॅाल चित्रपटगृहापासून सुरू झालेल्या पदयात्रेचा समारोप मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्याजवळ झाला. त्यावेळी नाना पटोले बोलत होते.

पुणे : संविधानाचा अपमान करणाऱ्यांकडून हर घर तिरंगा अभियान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आरोप
नाना पटोले

भारतीय जनता पक्षाने तिरंग्याचा सन्मान कधीच केला नाही. भाजपने संविधानाचा, तिंरग्याचा कायम अपमान केला मात्र आता ते हर घर तिंरगा अभियान राबवित आहेत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी येथे केला.

भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त रविवारी प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आझादी गौरव पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. कॅम्प परिसरातील कॅपिटॅाल चित्रपटगृहापासून सुरू झालेल्या पदयात्रेचा समारोप मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्याजवळ झाला. त्यावेळी नाना पटोले बोलत होते.

पटोले म्हणाले की, हिंदू महासभा आणि मुस्लिम लीगने एकत्र येऊन त्याकाळी इंग्रजांच्या विरोधात लढायचे सोडून सरकार स्थापन केले. देशाच्या फाळणीला जबाबदार असणाऱ्या विचारसरणीचे केंद्र सरकार आज घरावर तिरंगा लावा म्हणून सांगत आहेत. काँग्रेसच्या काळामध्ये प्रत्येकाच्या मनात तिरंगा हा अभिमानाने डौलत होताच परंतु आता जाती धर्माची तेढ निर्माण करून तिरंगा आपल्या घरावर लावावा म्हणून सांगितले जात आहे. भारतीय जनता पक्ष मात्र ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून तिरंगा झेंड्याचा अवमान करत आहे. चीनमधून हे झेंडे आयात करण्यात आलेले आहेत. या झेंड्याचा आकार व्यवस्थित नाही, तिरंग्यातील अशोकचक्र व्यवस्थित नाही. भाजपाने तिरंग्याचा कधीच सन्मान केला नाही. त्याला ठेच पोहचवण्याचे काम केले.

पदयात्रेचे चौकाचौकात अनेक ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते, स्थानिक मंडळे आणि नागरिकांनी स्वागत केले. काँग्रेसचे प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी मंत्री उल्हास पवार, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे, आमदार संग्राम थोपटे, संजय जगताप, प्रदेश उपाध्यक्ष रमेश बागवे, कमल व्यवहारे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, वीरेंद्र किराड, संजय बालगुडे आबा बागुल यावेळी उपस्थित होते.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या