पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यंदाच्या वर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. यंदा २ ऑक्टोबरला गांधी जयंती आणि आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन असून याच दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वर्धापनदिन आहे. हा संकेत राष्ट्रीय स्वंयसेवी संघाने समजून घ्यावा. १०० वर्धापनदिनाच्या दिवशी त्यांनी मनुस्मृतीचे दहन करुन संविधान आपल्याकडे ठेवावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
काँग्रेस पक्षाची विचारधारा करुणा, समतेच्या विचारांना धरून चालते. तर राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा आदर्श हा हिटलर आहे, समता नाकारणारी मनुस्मृती त्यांना महत्वाची वाटते, अशा टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी केली. राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि भाजपला वैचारिक पातळीवर कायमच विरोध करणारा काँग्रेस हा एकमेव देशव्यापी राजकीय पक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.
येत्या २ ऑक्टोबरला युवक काँग्रेसचे पदाधिकारी नागपूर येथे रेशीमबागेत जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्धापनदिनानिमित्त भारताचे संविधानाची प्रत भेट देणार आहेत. तसेच येत्या २८ सप्टेंबरला भगतसिंग जयंतीनिमित्त पुणे-नागपूर मशाल मोर्चा, २९ सप्टेंबरला नागपूरच्या दीक्षाभूमीवरून पदयात्रा, गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमापर्यंत ‘ चला गांधींकडे’ आदी मोहीम काँग्रेसकडून राबवली जाणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर केले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या वार्तालापाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले यावेळी उपस्थित होते. पत्रकारसंघात झालेल्या या वार्तालापाच्या कार्यक्रमात सपकाळ यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य करत आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट केली. तसेच पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर आता ते निवृत्ती घेतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मोदी यांनी निवृत्ती घेतल्यानंतर भाजपचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ज्या पद्धतीने सध्या वागत आहेत. ते लक्षात घेता मोदींच्या नंतर आता आपणच पंतप्रधान आहोत, असे स्वप्न फडणवीस यांना पडत आहे, अशी टीका सपकाळ यांनी केली.