पुणे : डेक्कन परिसरातील सह्याद्री रुग्णालयात यकृत प्रत्यारोपणानंतर पती आणि पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी सार्वजनिक आरोग्य विभागाने चौकशीसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर चौकशी पूर्ण होईपर्यंत रुग्णालयातील यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियांना तातडीने स्थगिती देण्यात आली आहे.

यकृत प्रत्यारोपणानंतर बापू कोमकर यांचा १५ ऑगस्टला मृत्यू झाला होता, तर दाता असलेल्या पत्नी कामिनी यांचा २२ ऑगस्टला मृत्यू झाला होता. रुग्णांच्या नातेवाइकांनी या प्रकरणी सह्याद्री रुग्णालयावर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सल्लागार समितीची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत या प्रकरणी चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही समिती चार आठवड्यांत चौकशी करून अहवाल सादर करणार आहे. याचबरोबर या समितीची चौकशी पूर्ण होईपर्यंत सह्याद्री रुग्णालयातील प्रत्यारोपण शस्त्रक्रियांना स्थगिती देण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. भगवान पवार यांनी दिली.

याआधी आरोग्य उपसंचालकांनी सह्याद्री रुग्णालयाला नोटीस बजावली होती. यकृत प्रत्यारोपणानंतर रुग्णासह दात्याचा मृत्यू झाल्यानंतरही सह्याद्री रुग्णालयाने याची माहिती उपसंचालक कार्यालयाला कळविली नव्हती. ही बाब आवश्यक असतानाही याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा ठपका या नोटिशीत ठेवण्यात आला होता. या नोटिशीला सह्याद्री रुग्णालयाने उत्तर दिले असून, त्याची तपासणी आरोग्य विभागाकडून सुरू आहे. याचबरोबर महापालिकेच्या आरोग्य विभागानेही सह्याद्री रुग्णालयाला नोटीस बजावून खुलासा मागविला आहे.

सह्याद्री रुग्णालयात यकृत प्रत्यारोपणानंतर रुग्ण आणि दात्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करण्यात येणार आहे. या कालावधीत सह्याद्री रुग्णालयाला यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करता येणार नाहीत.- डॉ. भगवान पवार, उपसंचालक, सार्वजनिक आरोग्य विभाग

आम्हाला आरोग्य अधिकाऱ्यांकडून नोटीस मिळाली आहे. या प्रकरणाच्या चौकशीमध्ये आम्ही पूर्ण सहकार्य करीत आहोत. चौकशीसाठी सहकार्याचा भाग म्हणून रुग्णालयातील यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया तात्पुरत्या स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या इतर सर्व रुग्णालयीन सेवा, इतर प्रत्यारोपण सेवा आणि शस्त्रक्रिया नेहमीप्रमाणे सुरू राहतील.- सह्याद्री रुग्णालय (डेक्कन)