पुणे : हृदयविकार हा भारतीय महिलांमधील मृत्यूचे प्रमुख कारण म्हणून समोर येत आहे. जवळपास १७ टक्के महिलांच्या मृत्यूला तो जबाबदार ठरत आहे. तरीही भारतीय महिलांमध्ये याबाबतचा धोका ओळखण्याची जागरूकता अत्यंत कमी असून हे धक्कादायक आहे, असे मत हृदयविकारतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार (एनएफएचएस), १५ ते ४९ वयोगटातील पाचपैकी एक महिला निदान न झालेल्या उच्च रक्तदाबाने त्रस्त आहे. हा उच्च रक्तदाब हृदयविकाराचा धक्का आणि पक्षाघात यासारख्या मोठ्या समस्यांना कारणीभूत ठरत आहे.
पुरुषांच्या तुलनेत, महिलांना हृदयविकाराची अनेकदा वेगळी लक्षणे दिसतात. यामध्ये थकवा, मळमळ, धाप किंवा दम लागणे, जबड्यातील वेदना किंवा पाठदुखी ही आहेत. वरवर पाहता ही लक्षणे साधी असल्याने त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे त्याचे निदान व उपचार उशिरा होतात. महिलांमधील संप्रेरकांमधील बदल, चुकीच्या जीवनशैलीचा अवलंब आणि वेळेवर तपासण्यांचा अभाव या कारणांमुळे त्या हृदयविकाराला बळी पडताना दिसून येत आहेत, याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.
गर्भधारणेनंतर गुंतागुंतीत वाढ
याबाबत हृदयविकार तज्ज्ञ डॉ. अन्नपूर्णा कालिया म्हणाले की, गर्भधारणा ही महिलांच्या हृदयाच्या आरोग्याबाबत आणखी गुंतागुंत निर्माण करते. गर्भधारणेच्या शेवटच्या टप्प्यात रक्तदाब वाढल्यास त्यांना झटके येऊ शकतात किंवा ते जीवावर बेतून मातामृत्यूही होऊ शकतो. जवळपास ३० टक्के महिला प्रसूतीनंतरही उच्च रक्तदाबाने त्रस्त असतात. त्यामुळे त्यांना दीर्घकालीन हृदयविकाराचा धोका निर्माण होतो.
गर्भधारणेमुळे आलेला उच्च रक्तदाब हा फक्त तात्पुरता त्रास नसून तो अनेक वर्षे हृदयाच्या आरोग्यावर परिणाम करतो. म्हणूनच गर्भधारणा काळात आणि नंतरही योग्य तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
जीवनशैलीचा परिणाम
आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलचे वरिष्ठ संचालक हृदयविकारतज्ज्ञ डॉ. राजीव सेठी म्हणाले की, बैठी जीवनशैली, कामाचे जास्त तास, प्रक्रिया केलेल्या अन्नाचे सेवन, धूम्रपान आणि अनियमित आहार या गोष्टी महिलांमध्ये हृदयविकाराचे संकट अधिक तीव्र करत आहेत. आता ३० आणि ४० वर्षांच्या महिलांमध्ये हृदयविकाराचा झटका व पक्षाघात दिसून येतो आहे, हे प्रमाण दोन दशकांपूर्वी दिसायचे नाही.
महिलांच्या हृदयविकाराशी संबंधित ८० टक्के मृत्यू टाळता येण्यासारखे असतात. यासाठी जागरूकता, वेळेवर तपासण्या, औषधे आणि नियमित तपासण्या आवश्यक आहेत. तसेच दररोज ८ ते १२ हजार पावले चालणे, संतुलित आहार घेणे व तणावावर नियंत्रण ठेवणे हे अधिक प्रभावी ठरते. प्रतिबंधासाठी अगदी किशोरवयापासून तपासण्या सुरू कराव्यात आणि वयाच्या तिशीपर्यंत दर दोन वर्षांनी संपूर्ण आरोग्य तपासणी करावी.
वेळेवर तपासणी गरजेची
आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलचे सहयोगी संचालक व हृदयविकार तज्ज्ञ डॉ. राजेश बदानी म्हणाले की, नियमित रक्तदाब तपासणी, कोलेस्टेरॉल तपासणी व वेळेवर इतर तपासण्या हे महिलांमधील हृदयविकाराचा धोका लवकर ओळखण्यात मदत करतात. सध्या चारपैकी एका महिला रुग्णामध्ये जीवनसत्त्व ‘बी १२’ ची कमतरता आणि होमोसिस्टीनची जास्त पातळी दिसते.
शरीरातील अमिनो ऍसिड हे होमोसिस्टीनचे प्रमाण वाढवते. ते सामान्यतः रक्तामध्ये आढळते. हे प्रमाण जास्त असल्यास हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आजार, हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघात होण्याचा धोका वाढू शकतो. तर कोलेस्टेरॉल असमतोलामुळे जवळपास ६० टक्के हृदयविकार होतात. त्याच वेळी तात्काळ वजन घटवणे, फॅट बर्नर गोळ्या, अतिशय कठोर आहार आणि अतिव्यायाम हे हृदयावर ताण आणतात.
जागरुकतेचा अभाव
हृदयविकारचे आजार सुरवातीच्या टप्प्यात ओळखता येतात. यातून गुंतागुंत टाळून आपत्कालीन उपचारांची गरजही कमी होते. सध्या याबाबतची महिलांमधील जागरूकता कमी असून ही बाब चिंताजनक आहे. फक्त १७ टक्के शहरी महिलांना त्यांच्या हृदयाच्या आरोग्याबद्दल योग्य माहिती आहे. जवळपास निम्म्या महिलांना उच्च रक्तदाबाची जाणीव गुंतागुंत झाल्यानंतरच होते. महिलांनी हृदयाच्या आरोग्याला प्राधान्य द्यायला हवे आणि अगदी किरकोळल क्षणांकडेही दुर्लक्ष करू नये, असे हृदयविकारतज्ज्ञांनी नमूद स्पष्ट केले.