लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : अवकाळीचे ढग विरून गेल्यामुळे आकाश निरभ्र झाले आहे. राजस्थान, गुजरातवरून उष्ण वारे येत आहेत. अरबी समुद्रावरून आद्रर्तायुक्त उष्ण वारे किनारपट्टीच्या दिशेने येत आहेत. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मुंबईसह किनारपट्टीवर सोमवारी कमाल तापमानात सरासरी दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ झाली. सोमवारी राज्यात कमाल तापमान सरासरी ३८ ते ४० अंशांच्या दरम्यान राहिले. मालेगावसह आठ ठिकाणी कमाल पाऱ्याने चाळीशी ओलांडली होती. पुढील दोन-तीन दिवस उष्णतेच्या झळा कायम राहणार असून, आज, मंगळवारी मुंबईसह किनारपट्टीला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ढगाळ हवामान विरून गेल्यामुळे राज्यभरात आकाश निरभ्र आहे. राजस्थान, गुजरातवरून उष्ण वारे किनारपट्टीवर येत आहे. तसेच अरबी समुद्रातून आद्रर्तायुक्त वारे किनारपट्टीवर येत असल्यामुळे सोमवारी मुंबईसह ठाणे, पालघर, रायगडच्या किनारपट्टीवर कमाल तापमानात वाढ झाली होती. रविवारच्या कमाल तापमानाच्या तुलनेत सोमवारी सांताक्रुज येथे सर्वाधिक ४.८ अंश सेल्सिअसने वाढ होऊन कमाल तापमान ३७.९ अशांवर गेले होते. कुलाब्यात ३४.७, हर्णेत ३१.२, डहाणूत ३५.६, अलिबागमध्ये ३२.६ आणि रत्नागिरीत ४३.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये आज, मंगळवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.

आणखी वाचा-महाराष्ट्राच्या ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्पाची केंद्राला भुरळ

राज्यात सोमवारी मालेगाव येथे सर्वाधिक ४२.६ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे. मालेगावसह नगर, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, सोलापू, अकोला, चंद्रपूर आणि वाशिम येथे कमाल तापमान ४०.० अंशांच्या वर राहिले.

विदर्भात कमाल तापमान सरासरी ३९.० अंशांवर राहिले. रविवारच्या तुलनेत कमाल तापमानात सरासरी २.० अशांनी वाढ झाली आहे. विदर्भात अकोला, चंद्रपूर आणि वाशिममध्ये पारा चाळीशीच्या वर होता. मराठवाड्यात कमाल तापमान सरासरी ३८.० अंशांवर राहिले. राज्यभरात ढगाळ हवामान कमी होऊन आकाश निरभ्र झाल्यामुळे पुढील दोन-तीन दिवस कमाल तापमानात वाढीचा कल कायम राहण्याचा अंदाज आहे.