दोन दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळणार असल्याचा दिलासादायक अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात अनेक ठिकाणी पावसाने उघडीप दिली असल्याने सर्वाधिक पावसाच्या कोकण विभागातील पालघर, रायगड, ठाणे जिल्ह्यासह आता रत्नागिरीतील पाऊसही सरासरीच्या तुलनेत मागे पडत आहे. मध्य महाराष्ट्रातील साताऱ्यापाठोपाठ पुणे, नाशिक आणि कोल्हापूरमध्येही पावसाचे प्रमाण कमी आहे.

विदर्भात दोन-तीन जिल्हे वगळता सर्वच भागांत पाऊस सरासरीच्या तुलनेत मागे आहे. मराठवाडय़ात मात्र पावसाने जुलैची सरासरी ओलांडली आहे.

मोसमी पाऊस दाखल झाल्यानंतर जूनच्या शेवटपर्यंत आणि जुलैच्या पहिल्या आठवडय़ात राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली. त्यामुळे जवळपास सर्वच ठिकाणी जूनच्या पावसाची सरासरी भरून निघाली होती. जुलैच्या दुसऱ्या आठवडय़ानंतर अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिली.

मुंबई परिसर, कोकणातील काही भाग आणि मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. इतरत्र पावसाने विश्रांती घेतल्याने पाणीसाठय़ातील वाढ थांबली असून, शेतकऱ्यांकडूनही चिंता व्यक्त केली जात आहे.

कोकण विभागातील पालघर, रायगड आणि ठाणे हे तीन जिल्हे जुलैच्या दुसऱ्या आठवडय़ापासून सरासरीच्या तुलनेत पावसात मागे पडले आहेत. या भागांत १५ ते ३५ टक्के पाऊस उणा आहे. रत्नागिरीत हंगामातील पाऊस सरासरी इतका असला, तरी तो मागे पडत चालला आहे.

मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि नंदुरबार हेही जिल्हे पावसात २० ते ३० टक्के मागे असताना आता पुणे, नाशिक, कोल्हापूर जिल्ह्यातही पाऊस सरासरीच्या तुलनेत खाली येतो आहे.

विदर्भात वाशिम आणि बुलडाणा जिल्हे वगळता इतर सर्वच जिल्ह्यंमध्ये पाऊस सरासरीच्या तुलनेत उणा आहे. मराठवाडय़ात मात्र नांदेड जिल्हा वगळता इतर सर्वत्र दमदार पाऊस झाला आहे.

पावसाची शक्यता कुठे?

पावसाला आवश्यक कमी दाबाचा पट्टा आणि वाऱ्यांची चक्रीय स्थिती सध्या कमकुवत आहे. मात्र, अरबी समुद्रात अनुकूल स्थिती निर्माण होणार असल्याने राज्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ३१ जुलैला कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात कोही ठिकाणी मुसळधारांचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या तीन दिवसांमध्येही कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस, तर मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्राच्या घाटक्षेत्रावर प्रामुख्याने जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rain forecast in two days abn
First published on: 31-07-2020 at 00:01 IST