Heavy Rain Alert Pune : पुणे शहर आणि जिल्ह्याच्या परिसरात पावसाचा जोर वाढला असल्याने जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पुणे शहर आणि जिल्ह्यातील शाळांना सुटी जाहीर केली आहे. हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने (रेड अलर्ट) या भागातील शाळा २५ जुलै रोजी बंद ठेवव्यात, आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहेत. खडकवासला धरणातून ४० हजार क्यूसेक विसर्ग सुरू होत आहे. तसेच पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी केले आहे.

या ठिकाणी जाण्यास नागरिकांना प्रतिबंध

खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात सकाळी सहा वाजल्यापासून ३५५७४ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तसेच धरण परिसरात १०० मिलिमीटर आणि घाटमाथ्यावर २०० मिलिमीटरपेक्षा जास्त सरासरी पावसाची नोंद झालेली आहे. पावसाच्या प्रमाणानुसार आणि येव्यानुसार विसर्ग पुन्हा वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही ठिकाणी जाण्यास नागरिकांना प्रतिबंध करण्यात आले आहे.
भिडे पूल, गरवारे कॉलेजमधील खिल्लारे वस्ती कॉलेज परिसर, शितळा देवी मंदिर डेक्कन, संगम पूल पुलासमोरील वस्ती, जयंतराव टिळक पूल आणि होळकर पूल परिसर या ठिकाणी जाण्यास नागरिकांना प्रतिबंध करण्यात आला आहे, असे खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून कळवण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिंहगड रस्त्यावरील सोसायट्या पाण्याखाली

सिंहगड रस्त्यावरील एकता नगरी परिसरातील द्वारका, जलपूजन, शारदा सरोवर, शाम सुंदर या गृहनिर्माण सोसायटी पाण्याखाली गेल्या आहेत.