बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि अरबी समुद्रातील वाऱ्यांचा वाढलेला वेग याचा परिणाम म्हणून कोकणासह मुंबई आणि परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. रविवारी पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतली असली, तरी सोमवारी (२९ जुलै) आणि मंगळवारी (३० जुलै) कोकणासह मुंबई, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.

गेल्या तीन-चार दिवसांपासून पाऊस सक्रिय झाला असून राज्यात सर्वदूर पाऊस सुरू आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीत दमदार पाऊस पडत आहे. गेल्या २४ तासांत कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी, तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.

कोकणात बुधवापर्यंत (३१ जुलै) मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. विदर्भ, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात सोमवापर्यंत (२९ जुलै) पावसाचा जोर कायम राहणार आहे. पुणे आणि परिसरात महिनाअखेरीपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. पुढील चार दिवस विदर्भ आणि मराठवाडय़ामध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईत पाऊस मंगळवारनंतरच (३० जुलै) विश्रांती घेईल. ऑगस्टमध्ये पुन्हा मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून पर्यटकांमध्ये लोकप्रिय असणारे माथेरान शनिवारी देशातील सर्वात जलमय स्थान ठरले. दिवसभरात साडेचारशे मिलिमीटर पावसाची नोंद झाली.