पुणे : हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कमध्ये जोरदार पावसामुळे वारंवार रस्त्यांना नद्यांचे रूप येत आहे. त्यामुळे आयटी पार्कचे रूपांतर वॉटर पार्कमध्ये होत आहे. विशेष म्हणजे, शासकीय यंत्रणांकडून गेल्या आठवड्यापासून विविध उपाययोजना सुरू असूनही प्रत्यक्षात आयटी पार्कमधील स्थिती ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ‘वर्क फ्रॉम होम’ची (घरून काम करण्याची) मागणी आयटीयन करू लागले आहेत. यावर आता राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कायमस्वरूपी उपाय सुचवला आहे.
हिंजवडी आयटी पार्क परिसरात १९ जूनला झालेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. आयटी पार्कमधील रस्त्यांना नद्यांचे रूप आल्याने त्यातून वाहनचालकांना मार्ग काढावा लागला. याबाबतच्या चित्रफिती आणि छायाचित्रे आयटीयन्सही समाजमाध्यमावर टाकली. पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूककोंडी झाली. अनेक रस्त्यांवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. त्यामुळे आयटीयननी पुन्हा घरून काम करण्याची मागणी सुरू केली आहे. वाहतूककोंडीत दररोज चार ते पाच तासांचा वेळ वाया जाणार असेल, तर घरून कामाचा पर्याय अधिक चांगला आहे, अशी प्रतिक्रिया ते व्यक्त करीत आहेत.
यावर खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, हिंजवडी येथील राजीव गांधी आयटी पार्क, माण, मारुंजी आदी भागातील पायाभूत सुविधांच्या बाबतीत येणाऱ्या अडचणींवर लवकर मार्ग निघत नाही. यासाठी नागरिकांना एमआयडीसी, महापालिका, मेट्रो, पीएमआरडीए, महावितरण, पोलीस आदी विभागांडे मोठा पाठपुरावा करावा लागतो. यामध्ये नागरिकांचा वेळ जातो. शिवाय मनस्तापही सहन करावा लागतो. हे टाळण्यासाठी राजीव गांधी आयटी पार्क, माण, मारुंजी आदी भागांचा समावेश असणारे एक स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याची गरज आहे. यावर सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी. यामुळे नागरिकांना आपल्या अडीअडचणींबाबत पाठपुरावा करणे सोपे होईल. माझी मुख्यमंत्री महोदयांना नम्र विनंती आहे की कृपया आपण याची गांभीर्याने नोंद घ्यावी आणि याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा.
उपाययोजनांवर प्रश्न
सरकारी यंत्रणांकडून आयटी पार्कमधील विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्यात पावसाच्या पाण्याचा निचरा आणि रस्तेदुरुस्ती यांचा प्रामुख्याने समावेश आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) संयुक्तपणे अनेक बैठका आणि पाहणी करून उपाययोजनांचे नियोजन केले आहे. या उपाययोजना सुरू करूनही प्रत्यक्षात आयटी पार्कमधील स्थिती बिकट आहे. पूर्वीच्याच समस्या अजूनही कायम आहेत. त्यामुळे या उपाययोजनांवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.