पुणे : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर; तसेच धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) सेवेवर परिणाम झाला. शेवगाव, जालना (अंबड), करमाळा (संगोबा), धाराशिव (परांडा, कळंब, जामखेड) या प्रमुख राज्य मार्गांवर पाणी साचल्याने मंगळवारी एसटी बसच्या काही फेऱ्या रद्द, तर काही बसचे मार्ग वळविण्यात आले. या भागातून येणाऱ्या गाड्या विलंबाने स्वारगेट आणि शिवाजीनगर स्थानकात पोहोचल्या. जालना मार्गावरील एसटी सेवा बंद करण्यात आली. एसटीचे वेळापत्रक कोलमडल्याने प्रवाशांचे हाल झाले.
स्वारगेट बस स्थानकातून वल्लभनगर-परांडा, स्वारगेट-करमाळा, वल्लभनगर-भूम, स्वारगेट-परांडा या बस वेळापत्रकानुसार रवाना झाल्या. मात्र, सोलापूर (करमाळा) ते धाराशिव हद्दीला जोडणाऱ्या महामार्गावरून सीनाई नदीचे पाणी वाहत असल्याने एसटी बसचे मार्ग वळविण्यात आले. त्यामुळे या बस स्थानकात पोहोचण्यास विलंब झाला.
भूम, परांडा, सोलापूर, जामखेड, टेंभुर्णी, बार्शी या एसटी स्थानकांवरून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या गाड्यांनाही विलंब झाला. काही बस रद्द करण्यात आल्या.दरम्यान, पावसाच्या अंदाजानुसार स्थानिक आगारप्रमुखांनी फेऱ्यांचे नियोजन करावे, अशा सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या आहेत.
राज्यातील ज्या महामार्गांवर पाणी वा पूरस्थिती असेल, त्या ठिकाणच्या आगारप्रमुखांना बस संचलनाबाबत निर्णय घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार मराठवाड्यात जाणाऱ्या गाड्या वेळेत गेल्या, मात्र येणाऱ्या गाड्यांना विलंब झाला असून, काही गाड्या स्थानिक आगारातूनच रद्द करण्यात आल्या आहेत.- अरुण सिया, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, पुणे</p>