पिंपरी-चिंचवडमध्ये दुचाकी आणि कारच्या भीषण अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास हा अपघात झाला आहे. अपघातात दुचाकीचालक हेल्मेटमुळे बचावला आहे. भरधाव दुचाकी थेट कारवर आदळली.

पिंपरीच्या लिंक रोडवर उड्डाण पुलाच्या खाली ही घटना घडली आहे. भरधाव दुचाकीचालक समोरून वळण घेत असलेल्या कारला समोरासमोर जाऊन धडकला. सुदैवाने हेल्मेट असल्याने दुचाकीचालकाला जास्त मार लागला नाही. दुचाकीचालकाला हेल्मेट हे अत्यंत गरजेचे असल्याचे पुन्हा एकदा या घटनेतून समोर आले आहे.

दुचाकीचालक थेट कारच्या समोरील काचेवर जाऊन धडकला आणि काही फूट अंतरावर जमिनीवर आपटला. दुचाकीचालकाला किरकोळ जखम झाली आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे, हे सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट दिसत आहे. दोघांनी एकमेकांना दोष दिल्यानंतर ते आपापल्या दिशेने निघून गेले. दैव बलवत्तर असल्याने दुचाकीचालक थोडक्यात बचावला आहे. दुचाकीचालकांनी हेल्मेट वापरावं असं वारंवार वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. हा व्हिडीओ बघितल्यानंतर नक्कीच दुचाकीचालक हेल्मेट वापरतील अशी अपेक्षा.