पुणे : राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हेल्पलाइनसाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध  आहेत.

राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्य मंडळातर्फे ४ ते ३० मार्चदरम्यान बारावीची, तर १५ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान दहावीची परीक्षा होणार आहे. करोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा होत असल्याने राज्य मंडळाने केलेल्या उपाययोजना, परीक्षेचे स्वरूप, पालक, विद्यार्थी आणि संबंधित घटकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी राज्य मंडळाने नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे.

या नियंत्रण कक्षामार्फत समुपदेशकांद्वारे सकाळी नऊ ते सायंकाळी सात  या वेळेत समुपदेशन सुविधा देण्यात येत आहे, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपेढी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्य मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या नियोजित परीक्षेच्या प्रश्नांचा सराव आणि माहिती होण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे (एससीईआरटी) विषयनिहाय प्रश्नपेढी विकसित करण्यात आल्या आहेत. या प्रश्नपेढय़ा   www.maa.ac.in   या संकेतस्थळावर  उपलब्ध करून देण्यात येत आहेत. परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयांचा सराव व्हावा, स्वयंअध्ययनासाठी मदत व्हावी,  परीक्षेला जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवा या उद्देशाने प्रश्नपेढय़ा तयार करण्यात आल्याचे एससीईआरटीचे संचालक एम. एम देवेंदर सिंह यांनी सांगितले.