दररोज दारू पिऊन मारहाण करणाऱ्या पतीला प्रतिकार करताना डोक्यात मार लागून पतीचा मृत्यू झाला. याप्रकरणी महिलेला सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्या वेळी ‘तो’ लहान होता, पण मोठा झाल्यावर त्याला समजले की, आईच्या हातून अनावधानाने हा गुन्हा घडला होता. मग त्याने न्यायालयीन लढाई लढून जन्मठेप रद्द करवून आईची शिक्षा कमी करण्यात यश मिळवले.. ही शिक्षा पूर्ण झाल्याने लवकरच आई मुक्त होणार आहे.
समीर गोपीनाथ धनवडे (वय २०, रा. लोणीकाळभोर) असे त्या मुलाचे नाव आहे. त्याने त्याची आई अलका धनवडे (वय ४५) यांना न्याय मिळवून दिला. अलका यांचे पती गोपीनाथ हे नेहमी दारू पिऊन भांडणे करत असत. ८ ऑक्टोबर २००८ रोजी ते दारू पिऊन मारहाण करत असताना अलका यांनी प्रतिकार केला असता पतीच्या डोक्याला पाटा लागून मृत्यू झाला. या घटनेच्या वेळी समीर हा फक्त तेरा वर्षांचा होता. खटला सुरू झाला असताना अलका यांच्याकडे पैसे नसल्यामुळे जामीनही मिळवता आला नाही. तसेच चांगला वकीलही देता आला नाही. या गुन्ह्य़ात त्यांना न्यायालयाने २००८ मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
समीरला हा थोडा मोठा झाल्यानंतर त्याला लग्नानंतर आईला झालेला त्रास आणि त्यानंतरही कारागृहात भोगावी लागत असलेली शिक्षा यामुळे व्यथित झाला. त्याने एका खासगी कंपनीत नोकरी करून आईची शिक्षा कमी करण्याचे ठरवले. त्यासाठी त्याने अनेक मोठय़ा वकिलांच्या भेटी घेतल्या. त्यांना त्याच्या आईचा खटला उच्च न्यायालयात चालविण्याची विनंती केली. मात्र, एवढे पैसे नसल्यामुळे त्याला लवकर यश आले नाही. अखेर अॅड. बी. ए. आलुर व अॅड. आर.एम. ढोमसे-पाटील हे हा खटला उच्च न्यायालयात लढविण्यास तयार झाले. त्यांनी अलका यांचा खून करण्याचा हेतू नसून ही घटना अनावधानाने घडली असल्याचे उच्च न्यायालयाच्या निर्दशानास आणून दिले. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य़ धरून अलका यांची जन्मठेपेची शिक्षा कमी करून सदोष मनुष्यवधाच्या खाली आठ वर्षे शिक्षा सुनावली. आता त्यांची फक्त पंधरा दिवस शिक्षा शिल्लक राहिली आहे, असे अॅड. अलुर यांनी सांगितले.