पुणे : यंदाच्या द्राक्ष हंगामात पंधरा एप्रिलपर्यंत देशातून १,८१,३९६ टन द्राक्ष निर्यात झाली आहे. अमेरिका युरोपीयन युनियनला उच्चांकी १,३१,४२१ टन, तर अन्य देशांना ५०,१९५ टन द्राक्ष निर्यात झाली आहे. अमेरिका आणि युरोपीयन युनियनला सरासरी ९० हजार ते एक लाख टन निर्यात होते.

राज्याच्या कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार एक नोव्हेंबर २०२३ ते १५ एप्रिल २०२४ पर्यंत देशातून १,८१,३९६ टन द्राक्ष निर्यात झाली आहे. त्यात अमेरिका आणि युरोपीयन युनियनला आजवरची उच्चांकी १,३१,४२१ टन द्राक्ष निर्यात झाली आहेत. ही निर्यात प्रामुख्याने नेदरलँडला (हॉलंड) झाली आहे. अमेरिका आणि युरोपीयन युनियन वगळता अन्य देशांना ५०,१९५ टन इतकी निर्यात झाली आहे. पण, या आकडेवारीत मुंबईतून झालेल्या निर्यातीचा समावेश नाही. मुंबईतून सुमारे ३० हजार टन निर्यात झाल्याचा अंदाज आहे.

हेही वाचा – यंदाचा एप्रिल महिना उष्णतेच्या लाटांचा; पुढील पाच दिवस पारा आणखी वाढणार

इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धामुळे लाल समुद्रातून होणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे आफ्रिकेला वळसा घालून वाहतूक करावी लागत आहे. वाहतुकीच्या दरातही वाढ झाली होती. तरीही अमेरिका आणि युरोपला यंदा उच्चांकी निर्यात झाली आहे. दरवर्षी अमेरिका आणि युरोपला सरासरी एक लाख टनांपर्यंत निर्यात होते. त्यात यंदा ३१ हजार टनांनी वाढ झाली आहे. भारतातून गेलेली जहाजे प्रामुख्याने नेदरलँडच्या किनारपट्टीवर जातात. तिथून गरजेनुसार युरोपात रस्तामार्गे वाहतूक होते. यंदा कॅनडाला होणाऱ्या निर्यातीला फटका बसला आहे. दरवर्षी कॅनडाला १३ टन वजनाचे ६० ते ७० कंटेनर जातात. यंदा जेमतेम १५ कंटेनर गेले आहेत.

द्राक्षांना ११० रुपयांपर्यंत विक्रमी भाव

यंदा द्राक्ष निर्यातीला नोव्हेंबर महिन्यात सुरुवात झाली. सुरुवातीला निर्यातीला दर ४० ते ५० रुपयांदरम्यान होता. हंगाम मध्यावर असताना ६० ते ६५ रुपये प्रति किलो दर होता. अखेरच्या टप्प्यात काही निवडक दर्जेदार द्राक्षांसाठी प्रति किलो ९० ते ११० रुपये दर मिळाला आहे. अद्यापही सोलापूर, नारायणगाव परिसरात निर्यातक्षम द्राक्षे उपलब्ध आहेत. पण, अवकाळी पावसामुळे द्राक्षांचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा – पुणे : वडिलांनी दिली मुलाला मारण्यासाठी ७५ लाखांची सुपारी

द्राक्ष निर्यात हंगाम आता अखेरच्या टप्प्यात आहे. अवकाळी पावसामुळे द्राक्षांचे नुकसान झाले आहे. तसेच लाल समुद्रातून वाहतूक बंद आहे. अन्यथा यंदा विक्रमी निर्यात झाली असती, अशी माहिती महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचे अध्यक्ष शिवाजी पवार यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरवर्षी सरासरी अडीच लाख टन द्राक्ष निर्यात होते. यंदा निर्यातक्षम द्राक्षांची उपलब्धता चांगली होती. वाहतुकीत अडथळे होते, तरीही युरोपला उच्चांकी निर्यात झाली आहे. कॅनडात होणाऱ्या निर्यातीला फटका बसला. हंगामाच्या अखेरीस निर्यातीत सरासरी गाठू. वाहतुकीत अडथळे नसते तर यंदा चांगली निर्यात झाली असती, अशी माहिती निफाड येथील द्राक्ष निर्यातदार अक्षय सांगळे यांनी दिली.