पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) उद्यापासून राज्यात बारावीची परीक्षा सुरू होणार आहे. गेल्या पाच वर्षांतील सर्वोच्च विद्यार्थी नोंदणी यंदा झाली असून, ३ हजार १९५ मुख्य केंद्रांवर १४ लाख ५७ हजार २८३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यंदा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा होत आहे. परीक्षेच्या तयारीबाबत राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. मंडळाच्या सचिव अनुराधा ओक या वेळी उपस्थित होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यंदा प्रचलित पद्धतीने परीक्षा होणार आहे. कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी यंदा पहिल्यांदाच उच्चस्तरीय बैठक झाली. परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका आकलनासाठी दहा मिनिटे देण्याऐवजी परीक्षेच्या शेवटी दहा मिनिटे दिली जातील. सीबीएसईला वीस मिनिटे आधी दिली जातात. त्यामुळे पालक-विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेऊन निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे देण्यात आली. कॉपी रोखण्यासाठीच्या कृति कार्यक्रमासाठी विविध घटकांकडून २३८ सूचना प्राप्त झाल्या.

हेही वाचा >>> पुणे : राज्यसेवा परीक्षेतील बदल २०२५ पासून लागू करण्यासाठी परीक्षार्थींसह काँग्रेसचे आंदोलन

विभागीय मंडळ, जिल्हाधिकारी स्तरावर भरारी आणि बैठे पथक प्रत्येक परीक्षा केंद्रावर असेल. परीक्षा केंद्र परिसरातील १०० मीटर परिसरातील छायाप्रतीची दुकाने बंद ठेवली जातील. तसेच सहायक परीरक्षकाचे जीपीएसद्वारे ट्रॅकिंग केले जाईल. नव्या केंद्रांवर सीसीटीव्ही बंधनकारक करण्यात आल्याचे राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले. उच्च शिक्षण शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप असला तरी बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा पूर्ण झाल्या आहेत. कोणाच्या प्रात्यक्षिक परीक्षा बाकी असल्यास २१ मार्चला लेखी परीक्षा संपल्यावर प्रात्यक्षिक परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध आहे, असे गोसावी यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Highest registration for class 12th this year class 12th exam starts from tomorrow pune print news ccp 14 ysh
First published on: 20-02-2023 at 12:50 IST