पिंपरी चिंचवड: हिंजवडीमध्ये दोन दुचाकी चालकांमध्ये हाणामारी झाली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल होत आहे. हिंजवडीमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही घटना घडली. दोघांनी एकमेकांना बेदम मारहाण केली. नागरिकांनी मात्र नेहमी प्रमाणे बघ्याची भूमिका घेतली. अखेर वाहतूक वार्डनच्या मध्यस्तीने हाणामारी थांबली.
हिंजवडीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात नेहमीच वर्दळ असते, वाहतूक कोंडी असते. वाकड च्या दिशेने जाणाऱ्या वाहतूक कोंडूमधून आडवी दुचाकी घालणाऱ्या दुचाकी चालकाला दुसऱ्या दुचाकी चालकाने जाब विचारला. त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. आडवी दुचाकी घालणाऱ्या दुचाकी चालकाने त्याच्या दुचाकीला धक्का दिला.
दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाली. बुक्क्यांनी आणि लाथांनी एकमेकांना मारहाण करण्यात आली, पैकी एकाने दुसऱ्याला उचलून खाली आपटले. वाद कुणीही सोडवण्यासाठी पुढे येत नव्हतं. वाहतूक वार्डनने आधी बघ्याची भूमिका घेतली.
काही मिनिटांनी मध्यस्ती केली आणि हाणामारी सोडवण्यात आली. ही सर्व घटना तिथे असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हाणामारी सोडवल्यानंतर दोन्ही दुचाकी चालक तिथून निघून गेले.