पुणे : ‘सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलायला फार आवडते. मात्र, त्यांना महाराजांच्या इतिहास संवर्धनासाठी, तो लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी काहीही करायचे नसते,’ अशी प्रतिक्रिया इतिहास अभ्यासक नरेंद्र मुरकुंबी यांनी सोमवारी व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास संवर्धित करून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कोणत्याही सरकारी मदतीशिवाय त्रयस्थपणे काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
भारत इतिहास संशोधक मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित स्नेहमेळाव्यात मुरकुंबी बोलत होते. महापालिकेच्या ‘वारसा जतन समिती’चे अध्यक्ष चंद्रकांत दळवी, इतिहास अभ्यासक श्रीकांत चौगुले, ज्येष्ठ उद्योजक अजित गाडगीळ, मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत, सचिव पांडुरंग बलकवडे, बी. डी. कुलकर्णी या वेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात गणेश खुटवड, अभिनव कुरकुटे, गिरिजा दुधाट यांना ‘तरुण इतिहास संशोधक’ पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच, मंडळाच्या त्रैमासिकाचे आणि सहा संशोधन ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले.
मुरकुंबी म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र कितीही वेळा वाचले, तरी त्यातून मिळणारी प्रेरणा कमी होत नाही, ती वाढतच जाते. कोणत्याही देशातील नागरिकांना त्यांचा इतिहास, ऐतिहासिक वारसा यांचा अभिमान असतो. त्याच्यावरच राष्ट्राचा पाया उभा राहतो. त्यामुळे आपला गौरवशाली इतिहास पुढच्या पिढीपर्यंत नेणे ही आपली जबाबदारी आहे. त्यासाठी येथील ऐतिहासिक वारसा, किल्ले, कागदपत्रे, नाणी इत्यादी इतिहासाची साधने संवर्धित करणे गरजेचे आहे.’
‘सध्या इतिहासाची अनेक साधने नव्याने उपलब्ध होत आहेत. मात्र, अनेक कागदपत्रे, मजकूर हे मोडी लिपीत असल्याने सर्वांनाच ती वाचता, अभ्यासता येत नाहीत. त्यामुळे आपला इतिहास सांगणारी सुमारे पाच कोटी कागदपत्रे तशीच पडून आहेत. सरकारने नव्या संशोधकांसाठी, अभ्यासकांसाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांनीच मिळून मोहीम उभारण्याची गरज निर्माण झाली आहे,’ असे रावत यांनी सांगितले.
चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. अनुराधा कुलकर्णी आणि वैशाली ढोरे यांनी प्रकाशित ग्रंथांची, तर डॉ. चंद्रकांत अभंग यांनी त्रैमासिकाची माहिती दिली. डॉ. सचिन जोशी यांनी सूत्रसंचालन केले. संदीप तिखे यांनी आभार मानले.