मुंबईच्या एशियाटिक सोसायटीचे पुनर्मुद्रणामध्ये योगदान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आंतरजातीय विवाह, विधवा पुनर्विवाह, अल्पवयीन विवाहाला विरोध, हुंडा प्रथेला बंदी आणि अस्पृश्यता निवारण अशा विविध क्षेत्रांत देशाच्या पारतंत्र्याच्या काळात आणि स्वातंत्र्योत्तर काळात समाज प्रबोधन आणि समाज सुधारणेमध्ये मूलगामी स्वरूपाचे योगदान देणाऱ्या ‘प्रार्थना समाज’ या संस्थेचा इतिहास नव्या स्वरूपात अभ्यासकांसाठी खुला होणार आहे. प्रार्थना समाजाच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षांचे औचित्य साधून प्रार्थना समाजाच्या इतिहासाचे पुनर्मुद्रण करण्यामध्ये मुंबईच्या एशियाटिक सोसायटीने योगदान दिले आहे. सामाजिक सुधारणेचा दस्तऐवज लवकरच खुला होणार आहे.

इतिहासाचे अभ्यासक आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी इतिहास विभागप्रमुख डॉ. राजा दीक्षित यांनी ‘प्रार्थना समाजाचा इतिहास’ या ९० वर्षांपूर्वीच्या ग्रंथाच्या संपादनाची जबाबदारी स्वीकारली आहे. ‘प्रार्थना समाजाचा इतिहास’ हा सुमारे सातशे पृष्ठांचा मूळ ग्रंथ समाजाच्या हीरकमहोत्सवी वर्षांचे औचित्य साधून १९२७ मध्ये प्रकाशित झाला होता. आता प्रार्थना समाजाच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षांचे औचित्य साधून मुंबई येथील एशियाटिक सोसायटीने या इतिहासाचे पुनर्मुद्रण करण्याचा संकल्प केला आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. शरद काळे आणि ग्रंथ प्रकाशन समितीच्या अध्यक्ष डॉ. मीना वैशंपायन यांनी या नव्या स्वरूपातील ग्रंथाला प्रस्तावना लिहिण्यासंदर्भात माझ्याशी संपर्क साधला होता. त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून केवळ प्रस्तावना लिहिण्यापेक्षाही संपादन करण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर ही जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपविली असल्याचे डॉ. राजा दीक्षित यांनी सांगितले. डॉ. दीक्षित यांनी यापूर्वी तेलंगणा येथील मराठी साहित्य परिषदेतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘समग्र सेतू माधवराव पगडी’ या दहा खंडांच्या बृहत प्रकल्पातील पगडी यांच्या इतिहासविषयक लेखनाच्या दोन खंडांचे संपादन केले आहे.

डॉ. पांडुरंग आत्माराम यांनी १८६७ मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना केली. अनेक वर्षे ते संस्थापक-अध्यक्ष होते. न्या. महादेव गोिवद रानडे आणि डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे प्रार्थना समाजाचे दिग्गज धुरीण नेते होते. समाज सुधारणेमध्ये प्रार्थना समाजाने दिलेले योगदान द्वा. गो. वैद्य यांनी शब्दबद्ध केले होते. समाजाच्या हीरकमहोत्सवी वर्षांचे औचित्य साधून ‘प्रार्थना समाजाचा इतिहास’ हा ग्रंथ १९२७ मध्ये प्रकाशित झाला होता. दोन भागातील या ग्रंथामध्ये समाजाच्या इतिहासाचा ३१९ पृष्ठांमध्ये मागोवा घेण्यात आला आहे. तर, दुसऱ्या भागात डॉ. पांडुरंग आत्माराम, मामा परमानंद, वासुदेव बाबाजी नवरंगे, बाळ मंगेश वागळे, वामन आबाजी मोडक, सदाशिव पांडुरंग पंडित, नारायण गणेश चंदावरकर आणि रामकृष्ण भांडारकर या धुरीण नेत्यांची चरित्रात्मक माहिती देण्यात आली आहे.

या संपादन प्रक्रियेविषयी माहिती देताना डॉ. दीक्षित म्हणाले, प्रार्थना समाजाचा इतिहास या पुनर्मुद्रण होत असलेल्या ग्रंथामध्ये द्वा. गो. वैद्य यांच्या मूळ संहितेला कोठेही धक्का लावला जाणार नाही. मात्र, काही ठिकाणी संपादकीय टिपा आणि सध्याच्या काळात आवश्यक असलेली पूरक माहिती देण्यात येणार आहे. वैद्य यांनी काही ठिकाणी केवळ आडनावं दिली आहेत. पूर्वीच्या लोकांना समजण्यासाठी ते पुरेसे होते. मात्र, आता वाचक आणि अभ्यासकांच्या आकलनासाठी त्या त्या ठिकाणी संबंधित व्यक्तींची पूर्ण नावे देण्यात आली आहेत. समाजाच्या मूलभूत स्वरूपाच्या कार्याचा सहा दशकांचा कालखंड मूळ ग्रंथामध्ये आलेला आहे. नंतरच्या ९० वर्षांमध्ये नेमके काय घडले त्याची माहिती नव्या ग्रंथामध्ये देण्यात येणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: History of prarthana samaj opens in a new form
First published on: 05-12-2017 at 03:42 IST