— सागर कासार

लोकसभा निवडणुकीला काही महिने शिल्लक असताना देशभरात राजकीय पक्षाकडून रणनीती आखली जात आहे. भाजपाला सत्तेपासून कसे दूर ठेवले जाईल, असाच प्रयत्न अनेकांचा आहे. या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पुण्यात एक व्यक्ती आपल्याला पंतप्रधान व्हायचंय आणि त्यासाठी जनतेनं आपल्याला मदत करावी असं आवाहन करणारा फलक घेऊन शहरात फिरत आहे.

मै प्रधानमंत्री श्री विजयप्रकाश कोंडेकर, आज आपकी चरण में प्रार्थना करता हूँ, मुझे एक रोटी दिजिए, मुझे एक रुपया दिजिए, अशा आशयाचा फलक आणि दानपेटी घेऊन ही व्यक्ती गेल्या पंधरा दिवसांपासून पुणे शहराच्या विविध भागात कमरेला पांढरा बर्मुडा आणि खांद्यावर पांढरा पंचा मात्र अंगात सदरा नसलेल्या अवस्थेत पायी फिरत आहे. ७५ वर्षीय विजयप्रकाश कोंडेकर ही ती व्यक्ती असून पुण्यातील बावधन भागात ते राहतात. शहरातील अनेक भागातून फिरताना आपली मागणी आणि पेहराव यामुळे ते अनेक नागरिकांचे ते लक्ष वेधून घेत आहे.

आपल्या या प्रचार मोहिमेबाबत संवाद साधल्यानंतर कोंडेकर म्हणाले की, मी मूळचा लातूरचा असून काही वर्षांपासून पुण्यात राहतो आहे. मी सांगली, लातूर, जळगाव, औरंगाबादमधून अपक्ष म्हणून लोकसभेची निवडणूक लढवली आहे. मात्र या निवडणुकांमध्ये मला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मात्र, मी जिद्द सोडलेली नाही. एक फिकीर पंतप्रधान बनू शकतो हे मी सिद्ध करुन दाखवणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सध्याचे राजकीय पक्ष हे आपले नाहीत. आपल्या डोक्यावरचं ते ओझ आहेत. ते सर्सास खोटं बोलून जनतेला फसवत असतात. आता मेहबुबा मुफ्तींचच पहा. त्या सत्तेत असतात तेव्हा भारताबद्दल चांगल बोलतात आणि सत्तेतून बाहेर गेल्यावर पाकिस्तानवर बोलतात. त्यामुळं माझा कुठल्याच राजकीय पक्षांवर विश्वास नाही. सर्वसामान्यांना सत्तेत आणायसाठीच मी अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

देशभरात सर्व ठिकाणी माझे उमदेवार असून मी पुण्यातून निवडणूक लढणार आहे. मला आता देशपातळीवर प्रचारासाठी फिरायचे आहे. त्यामुळे जनतेकडे मी केवळ रोटी आणि एक रुपया मागत आहे. हे करत असताना लोक मला भिकारी म्हणो किंवा आणखी काही मात्र, मी सर्वसामान्यांसाठी ही निवडणूक लढवणारच असे त्यांनी म्हटले आहे.