पुणे : देशातील घरांच्या बाजारपेठेत यंदा तेजी दिसून आली आहे. चालू वर्षांतील तीन तिमाहींमध्ये प्रमुख सात महानगरांत घरांचे ३.४८ लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. चौथ्या तिमाहीत हे व्यवहार एकूण ४.५ लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठतील, असा अंदाज आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा घरांच्या व्यवहारात ३८ टक्के वाढ नोंदविली जाण्याची शक्यता आहे.

अनारॉक ग्रुपने प्रमुख सात महानगरांतील मालमत्ता क्षेत्राचा अहवाल जाहीर केला आहे. त्यात दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, कोलकता यांचा समावेश आहे. या अहवालानुसार, मागील वर्षी सात महानगरांत घरांचे एकूण ३ लाख २७ हजार कोटी रुपयांचे व्यवहार झाले होते. यंदा तीन तिमाहींमध्ये घरांचे व्यवहार ३ लाख ४८ हजार कोटी रुपयांवर पोहोचले आहेत. चौथ्या तिमाहीत आणखी एक लाख कोटींहून अधिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. यामुळे या वर्षांतील घरांच्या विक्रीचे एकूण व्यवहार ४ लाख ५० हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडतील, असा अंदाज आहे.

हेही वाचा >>> देशात शिक्षणाचे झपाटयाने बकालीकरण, निर्बुद्धीकरण; ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांचे मत

यंदा जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत सात महानगरांमध्ये ३ लाख ४९ हजार घरांची विक्री झाली आहे. मागील वर्षभरातील एकूण घरांची विक्री ३.६५ लाख होती. यंदा मुंबईत सर्वाधिक १ लाख ११ हजार २८० घरांची विक्री झाली आहे. त्यांचे एकूण मूल्य १ लाख ६३ हजार ९२४ कोटी रुपये आहे. त्याखालोखाल दिल्लीत ४९ हजार ४७५ घरांची विक्री झाली असून, त्यांचे मूल्य ५० हजार १८८ कोटी रुपये आहे. बंगळुरूत ४१ हजार ७०० घरांची एकूण ३८ हजार ५१७ कोटी रुपयांना विक्री झाली. हैदराबादमध्ये ४४ हजार २२० घरे ३५ हजार ८०२ कोटी रुपयांनी विकली गेली. पुण्यात ६३ हजार ६८० घरांची ३९ हजार ९४५ कोटी रुपयांना विक्री झाली. चेन्नईत १६ हजार ३१० घरांची ११ हजार ३७४ कोटींना आणि कोलकत्यात १७ हजार २८० घरांची ९ हजार २५ कोटी रुपयांनी विक्री झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मागील वर्षभरातील घरांच्या व्यवहारांपेक्षा जास्त व्यवहार यंदा नऊ महिन्यांत झाले आहेत. महानगरांमध्ये घरांच्या किमतीत वर्षभरात ८ ते १८ टक्के वाढ झालेली आहे. तरीही घरांच्या विक्रीतील वाढ कायम राहिली आहे. – अनुज पुरी, अध्यक्ष, अनारॉक ग्रुप