पिंपरी : दूषित पाण्याद्वारे गुईलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या आजाराचा प्रसार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गृहनिर्माण सोसायट्यांनी बोअरवेल, विहिरीचे पाणी तपासून वापरावे. पाणी उकळून व गाळून पिण्याचे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

गुईलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या आजाराचे शहरात १५ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. पिंपरी, वाकड, भोसरी, पिंपळे गुरव, चिखली, तळवडे या भागात रुग्ण आढळले आहेत. या भागातील पिण्याच्या पाण्याची तपासणी करण्यासाठी नमुने पुण्यातील सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत पाठविले आहेत.

विहिरी, बोरवेल, टँकर मार्फत पिण्याच्या पाण्याचे ‘क्लोरीन’ तपासले जाणार आहे. त्याचबराेबर शहरातील सर्व गृहनिर्माण सोसायट्यांनी पाण्याच्या टाक्या वर्षातून दोनदा स्वच्छ कराव्यात. बोअरवेल व विहिरीचे पाण्याचे नमुने तपासणी करून ते पाणी वापरावे. पुरवठा धारकाकडून टँकर भरण्याच्या ठिकाणाबाबत सोसायटीला माहिती असणे आवश्यक आहे. तेथील पाण्याची गुणवत्ता तपासून घ्यावी. त्यानंतर पाण्याचा वापर करावा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाण्याच्या टाकीत पिण्याचे पाणी व टँकरचे पाणी एकत्रित करू नये. २० लिटर जारमधील पाण्याच्या गुणवत्तेची खात्री करूनच वापर करावा, सद्यस्थितीत पिण्याचे पाणी उकळून व गाळून प्यावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी केले आहे.