करोनाच्या भीतीने पुण्यात अघोषित संचारबंदी लागू झाली आहे. रस्ते ओस पडले आहेत. दुकानं बंद आहेत. पुण्यातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन केलं जातं आहे. हे झालं पुण्यातलं चित्र मात्र पुणे स्टेशनवरचं चित्र याच्या अगदी विरोधातलं आहे. पुणे स्टेशनवर माणसांची तुडुंब गर्दी आहे. करोनाच्या दहशतीमुळे पुणे सोडून जाणारे लोक पुणे स्टेशनवर आज सकाळपासून गर्दी करत आहेत. तिकिटांसाठी रांगा लागल्याचं चित्र आहे. करोनाला पळवायचं असेल तर गर्दी करु नका या आवाहनाचा या सगळ्यांना सपशेल विसर पडल्याचं दिसून येतं आहे.
पाहा व्हिडीओ
पुणे आणि पिंपरी या भागात करोनाचे २१ रुग्ण आढळले. पुण्यात बाहेरच्या देशातून येणाऱ्या लोकांचीही संख्या जास्त आहे. त्यामुळे या ठिकाणी या करोनाची दहशतही वाढली आहे. अशात पुण्यात अघोषित संचारबंदीच लागू झाल्याचं चित्र गेल्या दोन दिवसांपासून होतं. मात्र पुणे स्टेशन परिसरात पुणे शहरापेक्षा अगदीच वेगळं चित्र आहे. करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून गर्दी टाळा हे सांगण्यासाठीचं आवाहन स्टेशनवर जमलेले लोक पूर्णपणे विसरले आहेत. कारण या ठिकाणी खचाखच गर्दी झाली आहे. एवढंच नाही तर तिकिटांसाठीही रांगा लागल्याचं चित्र आहे.
आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पत्रकार परिषद घेऊन करोनासंदर्भातले नियम काटेकोरपणे पाळा असं आवाहन केलं. इतकंच नाही तर लग्न समारंभ किंवा अगदी अंत्यविधीलाही जमू नका असंही त्यांनी सांगितलं. अशात पुणे स्टेशनवर मात्र तुडुंब गर्दी झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे या गर्दीतून करोनाचा प्रादुर्भाव झाला आणि वाढला तर काय? याचं उत्तर तूर्तास तरी कुणाकडेच नाही.