पुणे : डेक्कन परिसरातील सह्याद्री रुग्णालयात यकृत प्रत्यारोपणानंतर पती आणि पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यकृत प्रत्यारोपणानंतर पतीचा त्याच दिवशी मृत्यू झाला, तर दाता असलेल्या पत्नीचा सात दिवसांनी मृत्यू झाला. रुग्णांच्या नातेवाईकांनी या प्रकरणी रुग्णालयावर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे. दोन्ही मृतांचे उत्तरीय तपासणी अहवाल मिळाल्यानंतर पोलिसांकडे तक्रार करण्यात येईल, असे नातेवाईकांनी स्पष्ट केले.

बापू बाळकृष्ण कोमकर (वय ४९) आणि कामिनी कोमकर (वय ४२, रा. हडपसर) असे मृत्यू झालेल्या पती-पत्नीचे नाव आहे. बापू कोमकर यांना यकृत प्रत्यारोपणाची गरज होती. त्यामुळे त्यांना यकृत देण्यासाठी पत्नी कामिनी पुढे आल्या. डेक्कन परिसरातील सह्याद्री रुग्णालयात १५ ऑगस्टला प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, शस्त्रक्रियेनंतर काही तासांतच बापू कोमकर यांचा मृत्यू झाला. त्यानंतर सात दिवसांनी २२ ऑगस्टला कामिनी यांचा मृत्यू झाला. कामिनी यांना कोणत्याही व्याधी नव्हत्या. तरीही, त्यांचा मृत्यू झाल्याने डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप कामिनी यांचे बंधू बलराज वाडेकर यांनी केला आहे. दोघांच्या उत्तरीय तपासणीचे अहवाल हाती आल्यानंतर या प्रकरणी पोलीसांकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

शस्त्रक्रियेसाठी १२ लाखांचे कर्ज

‘बापू कोमकर हे एका खासगी कंपनीत काम करीत होते, तर कामिनी या गृहिणी होत्या. त्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेणारा २१ वर्षीय मुलगा आणि आठवीत शिकणारी १५ वर्षीय मुलगी आहे. कोमकर कुटुंबीयांनी यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी १२ लाख रुपयांचे कर्ज काढले होते. तसेच, आधी उपचारांसाठी त्यांनी ८ लाख रुपये खर्च केले होते. या शस्त्रक्रियेसाठी त्यांनी सदनिकेवर कर्ज काढले होते. आता कोमकर कुटुंबावर या शस्त्रक्रियेच्या कर्जाचा बोजा आला आहे,’ असे नातेवाईकांनी सांगितले.

‘गुंतागुंतीमुळे मृत्यूचा रुग्णालयाचा दावा’

सह्याद्री रुग्णालयाने गुंतागुंतीमुळे हे मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. रुग्णालयाने म्हटले आहे की, ‘यकृत प्रत्यारोपण ही अतिशय जटिल आणि मोठ्या जोखमीचे असते. या प्रकरणात रुग्णाला शेवटच्या टप्प्यातील यकृताचा आजार म्हणजे लिव्हर सिरॉसिस होता. रुग्णालयाने कुटुंबीयांना या जोखमीबाबत माहिती दिली होती. शस्त्रक्रिया वैद्यकीय नियमांनुसार करण्यात आली. दुर्दैवाने, प्रत्यारोपणानंतर रुग्णाला हृदयविकाराचा झटका आला आणि प्रयत्न करूनही त्याला वाचवता आले नाही. शस्त्रक्रियेनंतर दात्याची प्रकृती सुरुवातीला सुधारत होती. मात्र, सहाव्या दिवशी अचानक त्यांचा रक्तदाब खूप कमी झाला आणि त्यानंतर अनेक अवयव निकामी होऊ लागले. प्रगत उपचार करूनही ते नियंत्रित करता आले नाहीत.’