पुणे : सासरच्या छळामुळे सहा वर्षांच्या मुलासह महिलेने इमारतीतून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच आंबेगाव भागात घडली होती. पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणीपतीला आंबेगाव पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना बुधवारी (१८ जून) कात्रज भागातील आंबेगाव बुद्रूकमधील एका सोसायटीच्या आवारात घडली.

शशिकांत त्र्यंबकराव देशमुख ( वय ३८ रा. दळवीनगर, आंबेगाव बुद्रुक) असे अटक केलेल्या पतीने नाव आहे. मयुरी शशिकांत देशमुख (वय ३१), विष्णू शशिकांत देशमुख (वय ६) अशी या दुर्देवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मायलेकांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयुरी एका खासगी शाळेत बालवाडीत शिक्षिक होत्या. त्यांचे पती शशिकांत हे एका बँकेत नोकरी करतात. बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास मयुरीने सहा वर्षांचा मुलगा विष्णू याच्यासह पाचव्या मजल्यावरुन उडी मारली. त्या वेळी मयुरीचे पती घरात नव्हते. आवाज झाल्यानंतर सोसायटीतील नागरिक बाहेर आले. तेव्हा मयुरी आणि त्यांचा मुलगा विष्णू हे सोसायटीतील आवारात रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. पती शशिकांत, सासू, तसेच नातेवाईकांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून मयुरीने आत्महत्या केली. सततचा संशय, शिवीगाळ, मारहाण आणि दमदाटीमुळे तिने मुलासह आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. आत्महत्या करण्यापूर्वी मयुरी यांनी चिठ्ठी लिहिली होती. सहायक पोलीस निरीक्षक स्वाती देवधर तपास करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.