लोकसत्ता प्रतिनिधी पुणे: चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा चाकूने गळा चिरून तिचा खून करण्यात आल्याची घटना कोंढव्यातील पिसोळी भागात घडली. या प्रकरणी पतीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तो पसार झाला आहे. आरती रणजीत झा (वय २६, रा. पद्मावती मंदिराजवळ, पिसोळी, कोंढवा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पती रणजीत उर्फ विकास झा (वय ३६) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आरती झा हिचे काका राजेश रामकृपाल झा (वय ३७) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हेही वाचा. Video : संचेती पुलावर चढून तरुणाची ‘स्टंटबाजी’ आरोपी रणजीत मूळचा बिहारचा आहे. तो मोटारीवर चालक आहे. आरती एका सराफी पेढेत कर्मचारी आहे. सहा वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला. एक महिन्यांपूर्वी ते पिसोळी परिसरात राहायला आहे. रणजीत आरतीच्या चारित्र्याचा संशय घेत होता. साेमवारी (२९ मे) रात्री साडेदहाच्या सुमारास रणजीत आणि आरतीत वाद झाला. आरतीचे काका राजेश झा आणि त्यांच्या पत्नीने घरी जाऊन वाद मिटवला. मध्यरात्री गाढ झोपेत असलेल्या आरतीचा गळा रणजीतने चिरला. गंभीर जखमी अवस्थेतील आरतीला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. हेही वाचा. पुणे: जनता वसाहतीत टोळक्याची दहशत; तरुणावर शस्त्राने वार या घटनेची माहिती मिळताच पाेलीस उपायुक्त विक्रांत देशमुख, सहायक आयुक्त पौर्णिमा तावरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, गुन्हे शाखेचे निरीक्षक संजय मोगले, संदीप भोसले आदींनी घटनास्थळी भेट दिली. आरोपी रणजीत पत्नीचा खून करुन पसार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.