पुणे : भविष्यातील हायपरलूपपासून अत्याधुनिक रोबोपर्यंतच्या नवकल्पनांची भरारी ‘सीआयआय’च्या वतीने आयोजित ‘नेक्सजेन मोबिलिटी शो’मध्ये पाहायला मिळाली. या प्रदर्शनात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह नवउद्यमींनी नवीन तंत्रज्ञानाच्या सादरीकरणातून भविष्याचे चित्र सर्वांसमोर मांडले.

‘नेक्सनेज मोबिलिटी शो’ची यंदा नावीन्यता, एकत्रितता आणि परिणाम ही संकल्पना होती. नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाची मांडणी, सध्याच्या व्यवस्थेत त्यांचे एकत्रीकरण आणि त्या माध्यमातून भविष्यात होणारा परिणाम असा उद्देश यामागे होता. नवउद्यमींसह विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात सादरीकरण केले. त्यात हायपरलूप, अग्निशमनासह संकटातील नागरिकांची सुटका करणारे रोबो, उंच इमारतींची सफाई करणारे ड्रोन अशा प्रकारचे भविष्यवेधी तंत्रज्ञान मांडण्यात आले. याचबरोबर वाहन उद्योगाशी निगडितही नवतंत्रज्ञानाची मांडणी करण्यात आली.

पुण्यातील ‘क्विनट्रान्स’ या नवउद्यमी कंपनीने स्वच्छतेसह गोदामातील मालाचे व्यवस्थापन करणारे रोबोचे सादरीकरण केले. ‘कार्गोएफएल’ने कृत्रिम प्रज्ञाआधारित मालवाहतूक यंत्रणेचे चित्र उलगडून दाखविले. ‘ॲनावे डिकॅल सर्व्हिसेस’ने ‘मिनीएचर ३डी मॉडेल’ मांडली होती. भोसरीतील ‘एआयसी पिनॅकल आंत्र्यप्रेन्युअरशिप फोरम’ने यात नावीन्यपूर्ण उत्पादने सादर केली. ‘बोरसे ऑटोमोटिव्ह’ने स्वयंचलित वाहन सादर केले. हे वाहन औद्योगिक वापरांसाठी तयार करण्यात आले आहे. याचबरोबर ‘स्मार्ट ट्रॅक्टर’ही सादर केला.

‘सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’मधील विद्यार्थ्यांनी संरक्षण आणि मदत कार्यासाठी चालकविरहित ‘रोव्हर’चा नमुना सादर केला. त्यात फेस रिक्गनिशन, ऑब्जेक्ट रिक्गनिशन आणि ट्रॅकिंग अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. ‘व्हीआयटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’मधील विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिक बोटीचा नमुना सादर केला. ‘जेएसपीएम’मधील विद्यार्थ्यांनी उंच इमारतीच्या खिडक्यांची सफाई करणाऱ्या ड्रोनचे सादरीकरण केले. अजिंक्य डी. वाय. पाटील युनिर्व्हसिटीतील विद्यार्थ्यांनी हायपूरलूपचा नमुना सादर करून भविष्याची झलक दाखविली.

वाहन उद्योगावर भर

अनेक नवउद्यमी कंपन्यांनी वाहन उद्योगाशी निगडित चाचणी उत्पादने व अंतिम नमुने सादर केले. वाहन उद्योगामध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवर त्यांचा वापर होऊ शकतो. कार्गोसने एका चाचणी वाहनाचे सादरीकरण केले. हे वाहन मालवाहतुकीसह त्याच्या साठवणुकीचेही काम करते. ई-कॉमर्स मंच, शीतपुरवठा साखळी यासाठी त्याचा वापर होऊ शकतो. यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याने मालवाहतूक साखळीचे व्यवस्थापनही अधिक सुलभ बनते.