देशात भाजपाचा विरोध वाढताना दिसतो आहे. २०१९ च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या आघाडीची चर्चा रंगली आहे. अशात पंतप्रधानपदासाठी शरद पवार यांचेही नाव पुढे येते आहे. याबाबतच नाना पाटेकर यांना विचारले असता, शरद पवार पंतप्रधान होता होता राहिले याबाबतची आठवण सांगितली. देवेगौडा जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा शरद पवारांच्याच नावाची चर्चा होती. तेव्हा ते पंतप्रधान होता होता राहिले.
आता एक मराठी माणूस जर देशाच्या सर्वोच्चपदी बसणार असेल तर मला आनंदच होईल अशा शब्दात नाना पाटेकर यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. नाम फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत नाना पाटेकर बोलत होते. काँग्रेसने काहीही केले नाही हा भाजपाचा आरोप सपशेल चुकीचा आहे. देशात इतकी वर्षे लोकशाही टिकली हे श्रेय काँग्रेसचे आहे असे म्हणत वर्धापन दिनाच्या दिवशीच नाना पाटेकर यांनी भाजपाला टोला लगावला.
आज झालेल्या पत्रकार परिषदेत नाना पाटेकर यांनी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याची मागणी केली. तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नानंतर त्यांनी राजकीय आणि सामाजिक प्रश्नांवर भाष्य केले आणि त्याचवेळी त्यांनी शरद पवार पंतप्रधान होता होता कसे राहिले हा किस्सा सांगितला.