पुणे : भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतील (आयसर पुणे) प्राध्यापक डॉ. सीमा शर्मा, डॉ. सौरभ दुबे यांच्यासह त्यांच्या २३ संशोधन सहकाऱ्यांची यंदाच्या मूलभूत पदार्थविज्ञानातील ‘ब्रेकथ्रू’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. ब्रेकथ्रू पुरस्कार हे विज्ञानाच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जातात.

आयसरने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. प्रा. शर्मा आणि प्रा. दुबे हे कॉम्पॅक्ट म्युऑन सोलिनॉयड (सीएमएस) या आंतरराष्ट्रीय सहकार्य प्रकल्पाचे सदस्य आहेत. सीएमएस हा प्रयोग वैज्ञानिक इतिहासातील सर्वांत व्यापक आंतरराष्ट्रीय संशोधन उपक्रमांपैकी एक आहे. त्यात ५४ देशांतील २४१ संस्थांमधून सुमारे ५,५०० कण भौतिकशास्त्रज्ञ, अभियंते, तंत्रज्ञ, विद्यार्थी आणि सहायक कर्मचारी सहभागी आहेत. यंदा सीएमएससह लार्ज हायड्रोजन कोलायडर प्रकल्पांतर्गत ॲलिस, ॲटलास आणि एलएचसीबी-सीईआरएनच्या या आंतरराष्ट्रीय सहयोग गटांनाही ब्रेकथ्रू पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सीईआरएन ही संस्था स्वित्झर्लंडमधील जीनिव्हा येथे कार्यरत आहे.

आयसरने दिलेल्या माहितीनुसार, दर वर्षी भौतिकशास्त्र, जीवशास्त्र व गणित या शाखांतील क्रांतिकारी संशोधनासाठी ब्रेकथ्रू पुरस्कार दिला जातो. जगभरातील हजारो संशोधकांचे सहयोग गट कणांचे मूलभूत स्वरूप समजून घेणे, नव्या कणांचा शोध घेणे आणि त्यांचा अभ्यास करण्यासाठी कार्यरत आहेत. त्यात आयसर पुणेतील सीएमएस गटातील सक्रिय सदस्य म्हणून प्रा. शर्मा आणि प्रा. दुबे यांच्या संशोधन गटातील इतर सहकाऱ्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यात आयसर पुणेचे काही माजी विद्यार्थीही आहेत. त्यांपैकी काहींनी सीएमएस गटात त्यांचे पदव्युत्तर संशोधन पूर्ण केले, तर काही जण सध्या इतर मोठ्या आंतरराष्ट्रीय प्रकल्पांमध्ये संशोधन करत आहेत. प्रा. दुबे यांचे संशोधन प्रमाणित प्रारूपापलीकडे पदार्थविज्ञान (बियाँड स्टँडर्ड मॉडेल फिजिक्स) या क्षेत्रात केंद्रित आहे, तर प्रा. शर्मा यांचा गट कृष्ण पदार्थ, पदार्थ-प्रतिपदार्थ असमतोल अशा विषयांत कार्यरत आहे.