भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतील (आयसर पुणे) मानद प्राध्यापक डॉ. दीपक धर यांना प्रतिष्ठेचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. सांख्यिकी भौतिकशास्त्रज्ञ असलेल्या डॉ. धर यांचे संशोधन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान आहे. अलीकडेच त्यांना प्रतिष्ठेच्या बोल्ड्झमन पदकाने गौरवण्यात आले होते. हे पदक मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले होते.

मूळचे उत्तर प्रदेशमधील प्रतापगडचे असणाऱ्या डॉ. धर यांचे महाविद्यालयीन शिक्षण अलाहाबाद विद्यापीठ आणि ‘आयआयटी, कानपूर’ येथे झाले. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून (कॅलटेक) पीएच.डी. प्राप्त केली. १९७८ मध्ये ते टाटा मूलभूत संशोधन संस्थेत (टीआयएफआर) रुजू झाल्यानंतर त्यांनी सांख्यिकी भौतिकशास्त्रात अतिशय मूलभूत आणि महत्त्वाचे संशोधन केले. तसेच विद्यार्थ्यांची पिढी घडवली. निवृत्तीनंतर ते ‘टीआयएफआर’सह आयसर पुणेमध्ये मानद प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

हेही वाचा – पुणे : कसब्यात राष्ट्रवादीचा सावध पवित्रा, महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढण्याचे निश्चित

हेही वाचा – “महिलांना मंत्रिमंडळात स्थान देणार”, फडणवीसांची प्रतिक्रिया; पोटनिवडणुकीवर म्हणाले, “बिनविरोध होण्यासाठी महाविकास..”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पद्मश्री सन्मान जाहीर झाल्यानंतर लोकसत्ताशी बोलताना डॉ. धर म्हणाले, की आजवरच्या माझ्या संशोधनाच्या कामाची दखल पद्मश्री पुरस्कारासाठी घेतली गेली याचा आनंद आहे. तसेच, या पुढील काळातही चांगले काम, संशोधन करत राहण्याचा प्रयत्न करत राहणार आहे.