पुणे : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे यांनी एकाच वेळी १८ सराइतांना शहरातून तडीपार करण्याचे आदेश दिले. तडीपार केलेल्या सराइतांमध्ये महिलांचा समावेश असून, बेकायदा गावठी दारु विक्रीचे गुन्हे दाखल आहेत.

पुणे पोलिसांच्या परिमंडळ पाचच्या अखत्यारीतील हडपसर- काळेपडळ, वानवडी, कोंढवा, बिबवेवाडी, लोणी-काळभोर, फुरसुंगी, मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजविणाऱ्या सराइतांविरुद्ध कारवाईचे आदेश पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे यांनी दिले होते. त्यांना पुणे शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्याचा प्रस्ताव पोलीस ठाण्यांकडून उपायुक्त शिंदे यांच्याकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सराइतांना तडीपार केल्याने नागरिकांनी पोलिसांच्या कारवाईचे कौतुक केले आहे.

तडीपार केलेल्या सराइतांची नावे पुढीलप्रमाणे – कानिफनाथ शंकर घुले (वय ४९, रा. महमंदवाडी), प्रमिला सचिन काळकर (वय ४१, रा. महमंदवाडी), रफिक उर्फ टोपी मेहमूद शेख (वय ५५, रा. कोणार्क सोसायटी, कोंढवा), गब्बू सनी प्रकाश परदेशी (वय ३३, रा. वानवडी), मौला उर्फ मौलाना रसूल शेख (वय २२, रा. लक्ष्मीनगर, कोंढवा), गणेश तुकाराम घावरे (वय २८, रा. काकडेवस्ती कोंढवा बुद्रूक) , नंदा प्रभू बिनावत (वय ५०, रा. बिबवेवाडी), अविनाश उर्फ तावू अर्जुन जोगन (वय २७, रा. अप्पर बिबवेवाडी), सारंग बबन गायकवाड (वय ३०, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) उमेश उर्फ टकाभाऊ निवृत्ती राखपसरे (वय ५०, रा. थेउर फाटा, पुणे-सोलापूर रस्ता), विनायक आदिकराव लावंड (वय ३१, रा. लोणी काळभोर), शुभम सुदाम विरकर (वय २५, रा. विरकरवस्ती, लोणी काळभोर), रोहन सोमनाथ चिंचकर (वय २७, रा. गाडीतळ, हडपसर), बापू सुरेश मकवाना (वय २१, रा. हडपसर), अनिकेत राजेश शेलार (वय २२, रा. सर्वोदय कॉलनी मुंढवा), दत्ता गणेश गायकवाड (वय ३६, रा. मुंढवा), दीपक उर्फ कव्वा गणेश गायकवाड (वय ३८, रा. मुंढवा), अमोल राजेंद्र तट (वय ४५, रा. पापडेवस्ती, भेकराईनगर).

सराइतांविरुद्ध कारवाईचा बडगा

जानेवारी ते ऑक्टोबर याकालावधीत परिमंडळ पाचमध्ये गुन्हेगारांविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे. २२ सराइतांविरुद्ध झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्यात आली आहे. २२ सराइतांना राज्यातील वेगवेगळ्या कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. मकोका कारवाई केल्यानंतर पसार झालेल्या ७८ सराइतांना पकडण्यात आले. गेल्या दहा महिन्यात ५० सराइतांना तडीपार करण्यात आले असून, १५० सराइतांविरूद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.