बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय करणाऱ्यांना व्याजाने पैसे देऊन त्यांना वसुलीसाठी मारहाण करणाऱ्या एकास अटक करण्यात आली. नूरमोहम्मद कादरसाब शिरहट्टी (वय ३९, रा. कुंभारवाडा, अशोक चौक, नाना पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तक्रारदार महिला बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत पानटपरी चालविते. आरोपी शिरहट्टी बुधवार पेठेतील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना व्याजाने पैसे द्यायचा. तक्रारदार महिलेला पैशांची गरज होती. तिने शिरहट्टीकडून ४० हजार रुपये २५ टक्के व्याजाने घेतले होते. शिरहट्टीने महिलेला दररोज ५०० रुपये देण्याची अट घालून दिली होती. महिलेने दोन दिवस पैसे न दिल्याने शिरहट्टीने तिला बुधवार पेठेतील क्रांती हॅाटेलसमोर मारहाण केली. त्यानंतर घाबरलेल्या महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली.
पोलिसांनी शिरहट्टीला अटक केली. शिरहट्टी वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना व्याजाने पैसे देतो. पैसे न दिल्यास त्यांना धमकावणे तसेच मारहाण करणे, असे प्रकार त्याच्याकडून केले जात होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, सहायक निरीक्षक अमित शेटे, उपनिरीक्षक तेजस्वी पाटील, अकबर कुरणे आदींनी ही कारवाई केली.