पुणे : गणेशोत्सवात पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतुसे जप्त करण्यात आली. वारजे माळवाडी आणि दत्तवाडी भागात ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी यश विनय शहा (वय २५, रा. देशपांडे गार्डन सोसायटी, नऱ्हे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिस शिपाई जी. डी. शिंदे यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात दिली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वारजे माळवाडी पोलिसंचे पथक गस्त घालत होते. भारती विद्यापीठ आणि सिंहगड रस्ता परिसरात गंभीर गुन्हे करणारा सराइत यश शहा हा वारजे भागात थांबला असून, त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती पोलीस कर्मचारी गणेश शिंदे आणि सत्यजीत लोंढे यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले.

परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रकाश धेंडे, उपनिरीक्षक संजय नरळे, नीलेश बडाख, योगेश वाघ, बालाजी काटे, सागर कुंभार, शरद पोळ, निखील तांगडे, अमित शेलार, अमित जाधव, महादेव शिंदे, अमोल सुतकर यांनी ही कामगिरी केली.

दत्तवाडीत पिस्तूल बाळगणारा अटकेत

दत्तवाडी भागात देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या सराइताला पर्वती पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पिस्तुलासह काडतूस जप्त करण्यात आली. स्वप्नील प्रवीण कांबळे (वय २८, रा. शनी मंदिरामागे, दत्तवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. दत्तवाडी भागात पोलिसांचे पथक गस्त घालत होते. त्या वेळी कांबळे याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलीस शिपाई महेश मंडलिक यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किरण पवार, पोलीस कर्मचारी प्रकाश मरगजे, महेश मंडलिक, श्रीकांत शिंदे, सद्दाम शेख, अमित चिव्हे, अमोल दबडे, मनोज बनसोड, सुर्या जाधव, नानासाहेब खाडे, राकेश सुर्वे, धनंजय रौदळ यांनी ही कामगिरी केली.