पुणे : परवानगी नसताना खासगी वाहनांमधून शहरातील शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यात येत असल्याने निदर्शनास आले आहे. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) विशेष तपासणी मोहीम हाती घेतली असून, वायुवेग पथके तैनात केली आहेत. या मोहिमेंतर्गत मर्यादेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या अधिकृत आणि अनधिकृत वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे.

परिवहन विभागाच्या निर्देशानुसार, शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यानुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये १० हजार ८०० बस आणि व्हॅन यांना आरटीओकडून परवानगी देण्यात आली आहे. दोन हजार १६२ वाहनधारकांनी अद्याप वाहन स्वास्थ्य तपासणी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यांपैकी काही वाहने अजूनही शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करत आहेत.

वाहतूक परवाना नसणाऱ्या खासगी वाहनांमधूनही विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याच्या तक्रारी आरटीओकडे आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर आरटीओने विद्यार्थ्यांची बेकायदा वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी वायुवेग पथके तैनात केली आहेत.

तपासणी कशी होणार?

या तपासणी मोहिमेत अधिकृत शालेय बस, व्हॅनचीदेखील तपासणी करण्यात येणार आहे. व्यावसायिक परवाने, विमापत्र, वाहन स्वास्थ्य प्रमाणपत्र, सुरक्षित वाहतुकीसाठी पायऱ्या, बैठक व्यवस्था, मर्यादेनुसार विद्यार्थ्यांची संख्या, अग्निप्रतिबंधात्मक उपकरण सुविधा आणि इतर उपाययोजनांची अंमलबजावणी केली आहे किंवा नाही, याची तपासणी केली जाणार आहे.

शाळा, पालकांना आवाहन

पुणे शहरातील शाळा व्यवस्थापन समितीने आणि पालकांनी विद्यार्थ्यांची ने-आण करणारी वाहने खासगी आहेत किंवा नाहीत, याची खातरजमा करावी. वाहन क्रमांकाची पाटी (नंबर प्लेट) पांढऱ्या रंगाची असल्यास ती बेकायदा असून, अशा वाहनांमधून पाल्याला पाठवू नये, असे आवाहन आरटीओ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शालेय विद्यार्थ्यांची खासगी वाहनांतून वाहतूक सुरू असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. बेकायदा वाहतूक होत आहे किंवा नाही, याची तपासणी करण्यासाठी विशेष मोहीम आखण्यात आली आहे. वायुवेग पथकाच्या माध्यमातून ही तपासणी सुरू आहे. – स्वप्नील भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे