पुणे : ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनाच्या शतकानंतरही रायगडावर दररोज संध्याकाळी तख्ताच्या दोन्ही बाजूला दोन दिवे आणि दिवटी म्हणजेच मशाल लावून रीतसर मुजरा केला जात असे. याबाबत ‘जोहार दिवटी मुजऱ्याचे समयी’ अशी नोंद मोडी कागदपत्रांमध्ये सापडते. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन १६८० मध्ये झाले आणि या नोंदी १७७३ नंतरच्या म्हणजे १८ व्या शतकातील आहेत. तब्बल शंभर वर्षांच्या काळानंतर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, त्यांच्या तख्ताबद्दल लोकांमध्ये प्रचंड आदर होता,’ अशी माहिती इतिहास अभ्यासक व मोडी लिपी तज्ज्ञ राज मेमाणे यांनी दिली.

‘नो डॉक्युमेंट्स नो हिस्टरी’ आणि श्री मल्हार पब्लिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दुर्गराज रायगड : एक नवा दृष्टिक्षेप’ या विषयावर भारत इतिहास संशोधक मंडळाच्या इतिहासाचार्य वि. का. राजवाडे सभागृहात राज मेमाणे यांचे व्याख्यान झाले. त्यावेळी थ्रीडी चित्रांच्या माध्यमातून मेमाणे यांनी विषयाची मांडणी करताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीच्या नव्या पैलूवर प्रकाश टाकला. ज्येष्ठ इतिहास अभ्यासक आणि मंडळाचे चिटणीस पांडुरंग बलकवडे, पेशव्यांचे वंशज पुष्कर पेशवा, चित्रपट दिग्दर्शक तुषार शेलार, संदीप पोतनीस आणि युवराज मेमाणे या वेळी उपस्थित होते.

राज मेमाणे म्हणाले, ‘अठराव्या शतकातील रायगड किल्ला आणि शिवाजी महाराजांच्या काळातील किल्ला यामध्ये फरक आहे. किल्ल्याचे महत्त्व अबाधित होते. ते केवळ लढण्याचे साधन नव्हते. तर, आर्थिक घडामोडींचे ठिकाण होते. रायगडावरील राजवाड्यातील आठ खोल्या, कैद्यांसाठी खोल्या, समुद्राच्या फेसाच्या दगडाचा वापर करून तयार केलेला सोपा, राजवाड्यातील हौद तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या तख्ताची सदर, विवेकसभा अशा अनेक इमारतींचे उल्लेख मोडी कागदपत्रांतून सापडतात.’

पांडुरंग बलकवडे म्हणाले, ‘राज मेमाणे यांनी पुणे पुरालेखागारातील मोडी कागदपत्रांवर आधारित लिहिलेल्या ‘महाराजांचा रायगड’ या ग्रंथाची इतिहासातील एक उत्तम संदर्भ ग्रंथ म्हणून नोंद राहील.