भाजपच्या पिंपरी पालिकेतील सत्ताकाळातील महत्त्वपूर्ण प्रकल्पांचीच कामे रखडली आहेत, असा तक्रारीचा सूर प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत भाजप नेत्यांनी व्यक्त केला. तांत्रिक मुद्दे उपस्थित न करता आयुक्तांनी या प्रकल्पांची कामे तातडीने पूर्ण करावीत, अशा सूचना भाजपचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी या बैठकीत केल्या.

शहरातील विविध प्रलंबित विकासकामांसाठी भाजप नेत्यांनी मुख्यालयात आयुक्तांसमवेत बैठक घेतली. आमदार लांडगे, माजी महापौर माई ढोरे, माजी पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक शंकर जगताप, हर्षल ढोरे, संदीप कस्पटे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. संतपीठ, स्मार्ट सिटीची कामे, सफारी पार्क, स्पाईन रस्ता, छत्रपती संभाजी महाराज पुतळा प्रकल्प, गोशाळा, रूग्णालयांची रखडलेली कामे आदी विविध विषयांवर बैठकीत चर्चा झाली. यातील बहुतांश कामे संथगतीने सुरू असल्याची तक्रार बैठकीत करण्यात आली.

विकास कामांच्या प्रगतीबाबत वेळोवेळी आढावा घेतला जाईल –

यासंदर्भात आमदार लांडगे म्हणाले, “शहरातील कोणतीही विकासकामे प्रशासकीय राजवट आहे म्हणून तांत्रिक मुद्द्यावर प्रलंबित ठेवली जात आहेत. रखडलेली कामे तातडीने पूर्ण करावीत. भाजपचा प्रत्येक पदाधिकारी शहरातील विकासकामांकडे लक्ष ठेवून आहे. विकास कामांच्या प्रगतीबाबत वेळोवेळी आढावा घेतला जाईल. नागरिकांचे आरोग्य, पाणी आणि रस्ते या मुद्द्यांवर प्रकर्षाने लक्ष देण्याची गरज आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयुक्त राजेश पाटील यांनी, प्रभागातील तरतुदी किंवा विकासकामांना कोणताही अडसर नाही. वेळेत ही कामे पूर्ण होतील, याची दक्षता प्रशासनाकडून घेतली जाईल, अशी ग्वाही बैठकीत दिली. ऑक्टोबर महिन्यापर्यत शहरातील कोणत्याही कामांना अडचण येणार नाही. मात्र, ऑक्टोबरनंतर नव्याने अंदाजपत्रक केले जाईल, अशी माहिती त्यांनी बैठकीत दिली.