पुणे : बारामती नगरपरिषदेतील नगर रचानकार पदावरील अधिकाऱ्याला एक लाख रुपयांची लाच घेताना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. बुधवारी (१९ मार्च) सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. विकास किसनराव ढेकळे (वय ५०) असे अट करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बारामती तालुका नगर परिषदमध्ये विकास ढेकळे हे नगर रचनाकार (टॉऊन प्लॉनर) आहेत. दरम्यान, यातील तक्रारदार हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांची फर्म आहे. फर्मद्वारे बारामती येथील रूई या ठिकाणी निर्मित विहार इमारतीच्या बी विंग १ या गृह प्रकल्पाचा प्रस्ताव नगरपालिकेत दाखल केला आहे. तो प्रस्ताव मंजूर करण्यासाठी लोकसेवक नगर रचनाकार विकास ढेकळे यांनी तक्रारदार यांच्याकडे दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

याबाबत तक्रारदार यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीची विभागाने पडताळणी केली. त्यात दोन लाखांची मागणी करून तडजोडीअंती एक लाख ७५ हजार लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. नंतर सापळा कारवाईत लाचेचा पहिला हप्ता म्हणून एक लाख रुपये घेताना पंचासमक्ष विकास ढेकळे यांना पकडण्यात आले. ही कारवाई ऑक्सिजन जिम या ठिकाणी करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.