पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांवरील वाढत्या खड्ड्यांकडे एका नागरिकाने अनोख्या पद्धतीने प्रशासनाचे लक्ष वेधले. भोसरीतील चौकात उभे राहून ‘रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी कर्ज हवे,’ असा फलक हातामध्ये घेऊन, या नागरिकाने खड्डे कायमस्वरूपी बुजविण्याची मागणी केली.पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांवर पावसाळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत दोन हजार ५८२ खड्डे पडले हाेते. त्यांपैकी एक हजार ७१३ खड्डे बुजविले. शहरात केवळ ८०४ खड्डे असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. असे असले, तरी आजही शहरातील विविध भागांतील रस्त्यांवर खड्डे दिसून येत आहेत. मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने रस्त्यांची चाळण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर हृषीकेश पाचणकर यांनी भोसरी चौकात उभे राहून रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी कर्ज हवे असल्याचा फलक हातात घेऊन महापालिकेच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली. पाचणकर हे कामाला जाण्यापूर्वी आणि कामावरून घरी परतताना चौकाचौकांत थांबून खड्डे बुजविण्यासाठी अनोख्या पद्धतीने महापालिकेकडे पाठपुरावा करताना दिसतात.
गेल्या दोन महिन्यांपासून ते पुणे, भोसरी, चाकण, चऱ्हाेली आदी भागांतील रस्त्यावर थांबून ते जनजागृती करीत आहेत. ‘खड्ड्यांची दुरुस्ती तुम्ही तात्पुरती करता, मग आम्ही कर कायमस्वरूपी का भरायचा,’ असा सवालही ते फलकाद्वारे प्रशासनाला करीत आहेत. ‘कर भरूनही खड्डेमय रस्त्यांतून प्रवास करावा लागतो. खड्ड्यांमुळे अपघातही होतात. खड्ड्यांची तात्पुरती डागडुजी न करता ते कायमस्वरूपी दुरुस्त करावेत,’ असे पाचणकर म्हणाले.