पिंपरी : ‘क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या शौर्याच्या, प्रखर देशभक्ती व त्यागाच्या गोष्टी इतिहासात वाचत होतो, त्याचे प्रत्यक्ष दर्शन संग्रहालयातून चलतचित्राद्वारे घडले. देशातील तरुणांनी चिंचवडमध्ये येऊन चापेकरांच्या स्मृतींना अभिवादन करावे. त्यांच्याकडून देशभक्तीची प्रेरणा घ्यावी आणि भारत मातेच्या उत्कर्षासाठी कायम प्रयत्न करत रहावेत,’ असे आवाहन केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी केले.
चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालयाला केरळचे राज्यपाल आर्लेकर यांनी शनिवारी भेट दिली. चापेकर स्मारकाची पाहणी केली, त्या वेळी ते बोलत होते. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग कार्यवाह मुकुंदराव कुलकर्णी, जिल्हा कार्यवाह नरेंद्र पेंडसे, धर्म जागरण प्रमुख हेमंतराव हरहरे, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे कोषाध्यक्ष रवींद्र नामदे या वेळी उपस्थित होते.
राज्यपाल आर्लेकर म्हणाले, ‘चापेकर बंधूंनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेले बलिदान, त्याग याची छाेटीशी झलक स्मारकात बघता आली. हुतात्मा चापेकर वाडा, स्मारकात परंपरा, संस्कृतीच्या अनेक सुंदर छटा पाहावयास मिळाल्या. देशातील तरुणांनी चिंचवडमध्ये येऊन चापेकरांच्या स्मृतींना अभिवादन करावे. येथे आल्यावर देशभक्तीची प्रेरणा मिळेल. देशभक्तीची प्रेरणा घेऊन भारत मातेच्या उत्कर्षासाठी कायम प्रयत्न करत राहावेत.’
चापेकरांच्या जीवनातील १८ प्रसंग
दामोदर हरी चापेकर, बाळकृष्ण हरी चापेकर आणि वासुदेव हरी चाफेकर यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले चापेकर बंधू यांच्या बलिदानाची आठवण आणि त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या जीवनातील १८ प्रसंग माहिती आणि डिजिटल स्वरूपात चापेकर वाड्यात उभारण्यात आले आहेत. त्यामध्ये रँडचा वध करण्याच्या प्रसंगासह तुळशी वृंदावन असणारा चौक, देवघर, स्वयंपाकघर, धान्य कोठारी असे प्रसंग साकारले आहेत.
तीन मजल्यांतील स्मारकाच्या पहिल्या टप्प्यात विविध ऐतिहासिक घटना मांडण्यात आल्या आहेत. पहिल्या मजल्यावर चापेकर बंधूंच्या वाड्याची गोष्ट, भगिनी निवेदिता यांनी या वाड्यास दिलेली भेट, चापेकरांचे मुद्राणालय रँडच्या वधानंतर चापेकर बंधूंना येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली होती. येरवडा कारागृहातील एक प्रसंग ही या आठवणीत उभारण्यात आला आहे. त्याची माहितीही ध्वनिफितीतून दिली जाते. दुसऱ्या मजल्यावर रँडचा वध केल्याचा प्रसंग साकारण्यात आला आहे. क्रांती तीर्थ या राष्ट्रीय संग्रहालयात १५०० हून अधिक क्रांतिकारकांची सचित्र माहिती इतिहास पहिल्यांदाच एकत्रित अभ्यासता येणार आहे.