पुणे : राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे (एससीईआरटी) नवनियुक्त शिक्षक, क्रीडा आणि कला शिक्षक, वरिष्ठ आणि निवड श्रेणी प्रशिक्षणातील अनुत्तीर्ण, अनुपस्थित शिक्षकांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असून, हे प्रशिक्षण दिवाळीच्या सुटीत होणार आहे.

‘एससीईआरटी’ने याबाबत परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या आहेत. राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय, खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्था शाळांतील सर्व नवनियुक्त शिक्षकांसाठी जिल्हास्तरावर ५० तासांचे प्रशिक्षण २५ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. त्यात पहिली ते आठवी, नववी ते बारावीच्या शिक्षकांचा समावेश आहे. प्रशिक्षणातील पहिले सहा दिवस सर्व शिक्षकांना समान प्रशिक्षण देऊन सातवा दिवस स्वतंत्र घटकांसाठी असेल.

प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थ्यांना देण्यासाठीच्या मार्गदर्शक पुस्तिका जिल्ह्याच्या जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेत उपलब्ध करून दिल्या जातील. वर्गसंख्येनुसार आवश्यक सुलभकांची निवड करून त्यांना प्रशिक्षण घटकसंचातील समाविष्ट घटकांची माहिती करून द्यावी, हे प्रशिक्षण प्रत्यक्ष (ऑफलाइन) स्वरूपाचे आहे. त्यामुळे प्रशिक्षण कालावधीत कोणत्याही प्रकारची रजा लागू राहणार नाही. १०० टक्के नवनियुक्त शिक्षकांच्या प्रशिक्षणाची जबाबदारी संबंधित जिल्ह्यातील जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी यांची राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यातील शिक्षकांचे वरिष्ठ व निवड प्रशिक्षण २ ते १२ जून या कालावधीत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांच्या स्तरावर घेण्यात आले होते. या प्रशिक्षणासाठी नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांपैकी काही प्रशिक्षणार्थी विविध कारणांमुळे अनुपस्थित होते, तर प्रशिक्षणोत्तर चाचणीमध्ये काही प्रशिक्षणार्थी अनुत्तीर्ण झाले. अशा ५ हजार ५२७ अनुपस्थित, अनुत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण २५ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत प्रत्यक्ष (ऑफलाइन) पद्धतीने होणार आहे. त्यासाठी पुन्हा नोंदणी करण्याची, शुल्क भरण्याची आवश्यकता नाही.

अनुपस्थित प्रशिक्षणार्थ्यांच्या गटनिहाय प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात येईल. त्याशिवाय कला आणि क्रीडा शिक्षकांचे तालुकास्तरीय प्रशिक्षण २५ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. त्यानंतर विभागस्तरीय प्रशिक्षण १ ते ३ नोव्हेंबर या कालावधीत विभागीय जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत आयोजित करण्यात येणार आहे.

अध्यापक विद्यालयातील अध्यापकाचार्यांचे १० दिवसांचे प्रशिक्षण हे राज्यस्तरावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतर्फे आयोजित केले जाणार आहे. त्याबाबतच्या सूचना जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.