पुणे : विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठीची नियमावली कागदावरच राहिली असल्याचे चित्र आहे. दप्तराचे वजन विद्यार्थ्यांच्या वजनाच्या १० टक्केच असणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना वजनी दप्तराचा भार सोसावा लागत असून, दप्तराच्या वजनासंदर्भातील नियमावलीची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी पालक संघटनांकडून करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे वजन हा चर्चेचा विषय आहे. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून दप्तराचे वजन कमी करण्यासाठी एकात्मिक पाठ्यपुस्तकांसारखे काही प्रयोगही करण्यात आले होते. मात्र, शाळेत शिकवले जाणारे विषय, त्यासाठीची वह्या-पुस्तके, डबा, पाण्याची बाटली अशा साहित्यामुळे विद्यार्थ्यांना वजनदार दप्तराचा भार वाहावा लागत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर, महापेरेंट्स पालक संघटनेचे दिलीपसिंह विश्वकर्मा यांनी शिक्षणमंत्र्यांना निवेदन देऊन दप्तराचे ओझे कमी करण्याच्या नियमावलीची अंमलबजावणी करण्याकडे लक्ष वेधले आहे.
केंद्र सरकारने २००६ मध्ये विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केली होती. त्यानुसार दप्तराचे ओझे मुलांच्या वजनाच्या दहा टक्क्यांपर्यंत असावे, अशी तरतूद आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातही दप्तराचे वजन कमी असण्याबाबत नमूद केले आहे. दप्तरासाठीच्या नियमावलीत विद्यार्थ्यांसाठी वर्गातच कपाटे असावीत, असेही नमूद आहे. मात्र, बहुतांश शाळांमध्ये कपाटे उपलब्ध नाहीत.
सरकार आणि पालकांनी दप्तराच्या वजनाकडे डोळसपणे पाहण्याची गरज असताना राज्यातील अनेक शाळांमध्ये या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना दप्तराच्या ओझ्यातून मुक्त करण्यासाठी राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या शालेय दप्तरांबाबतची नियमावली, राष्ट्रीय शिक्षण धोरणातील मार्गदर्शक तत्त्वांची तातडीने अंमलबजावणी करावी, असे विश्वकर्मा यांनी नमूद केले आहे.
‘सद्य:स्थितीत दप्तराच्या वजनापेक्षा मुलांवर शैक्षणिक अपेक्षांचे ओझे जास्त असल्याचे जाणवते. शाळेच्या वेळापत्रकात कमी विषयांच्या जास्त वेळाच्या तासिका ठेवणे शक्य आहे. तसेच कला, खेळ यांचाही वेळापत्रकात समावेश असावा. कारण जीवनशिक्षणही तितकेच महत्त्वाचे आहे. जीवनशिक्षणासाठी दप्तराची गरज नसते,’ याकडे बालविकासतज्ज्ञ डॉ. सुनील गोडबोले यांनी लक्ष वेधले.
दप्तराचे वजन वाढू नये या दृष्टीने शाळा, शिक्षकांनी अतिरिक्त अभ्यास साहित्य आणण्यास विद्यार्थ्यांना सांगू नये. दप्तराच्या वजनासंदर्भात यापूर्वी वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत. आता पुन्हा दप्तराच्या वजनासंदर्भात तपासणी करण्याच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या जातील. – शरद गोसावी, प्राथमिक शिक्षण संचालक
सध्या पहिलीपर्यंतच्या दप्तराचे ओझे कमी झाले आहे. मात्र, तिसरीपासून विषय वाढतात, तशा वह्या-पुस्तकांमध्ये वाढ होते. काही शाळांनी दप्तराचे वजन कमी करण्यासाठी चांगले प्रयोग केले. तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. – डॉ. सुनील गोडबोले, बालविकासतज्ज्ञ