नारायणगाव : नारायणगाव येथील मीना नदीपात्रातील कोल्हापूर बंधाऱ्याजवळ प्रौढ व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. तुळशीराम भीमा मधे (वय ४५, रा. पांगरी, ता. अकोले, जि. अहिल्यानगर) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, पोलीस उपनिरीक्षक जगदेव पाटील, हवालदार मंगेश लोखंडे, संतोष कोकणे, पोलीस पाटील सुशांत भुजबळ यांनी घटनास्थळी पाहणी केली. श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले.

‘मृतदेह नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. मृताच्या नातेवाइकांना घटनेची माहिती देण्यात आली. पुलावरून पडल्याने मृत्यू झाला असावा,’ असे नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी सांगितले.