पिंपरी : जेष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकत्र यावे, असे फलक नागपूरमध्ये झळकले होते. पवार कुटुंबाचे राजकीय मनोमीलन व्हावे, अशी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. अशी शक्यता आहे का असे विचारले असता अजित पवार यांनी एका वाक्यात उत्तर दिले. ‘सल्ला आणि कारवाई’ (सजेशन फॉर ऍक्शन) असे म्हणत दोन्ही राष्ट्रवादीच्या मनोलीनावर अधिक भाष्य करणे अजितदादांनी टाळले.

उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी पिंपरी-चिंचवड शहर दौऱ्यावर होते. आकुर्डीत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अधिकाऱ्यांना खडसावले, ओरडून बोलले असल्याबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले, ‘राज्य घटनेने सर्वांना अधिकार दिलेला आहे. कोणी कशा पद्धतीने काम करायचे, कोणी कसे बोलायचे, कसे वागायचे, हे त्यांनी ठरवावे.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या मतचोरीच्या आरोपाबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले, ‘विरोधक जिंकले की मतांची चोरी होत नाही. मतदान यंत्राचा मुद्दा उपस्थित होत नाही. मात्र, त्यांचा पराभव झाला की मतचोरी झाली म्हणतात. लोकसभा निवडणुकीवेळी राज्यघटना बदलणार असे खोटे कथानक पसरविले. त्यात विरोधकांना थोडे यश आले. आता नव्याने मतचोरीचे खोटे कथानक पसरविले जात आहे.

अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमातीमध्ये (एसटी) इतर समाजाला समाविष्ट करुन घेण्याचा सर्वाधिक अधिकार केंद्र सरकारला आहे. अनेक घटकांना समाविष्ट करून घेण्याची मागणी होते. कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घेतले जातील. तर, पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांनी २०१७ चा अपवाद वगळता माझ्यावर आणि पक्षावर कायम विश्वास टाकलेला आहे. त्यामुळे मी संपर्क कायम ठेवण्यासाठी आलो असल्याचे ते म्हणाले.

पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करु

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या हल्ल्यांबाबतही अजित पवारांनी भूमिका मांडली. पत्रकार पत्रकारांचे काम करत असतात. कोणीही कायदा हातात घेता कामा नये. मी पोलीस अधिकाऱ्यांशी बोलतो. त्या ठिकाणी चूक करणारे कोणी असतील, त्यांच्यावर कारवाई करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.