पिंपरी : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेला जोरदार पाऊस, पवना, मुळशी धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग यामुळे शहरातून वाहणाऱ्या पवना, मुळा, इंद्रायणी या नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे रात्री उशिरा संजय गांधीनगर, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, जाधवघाट, किवळे, वाल्हेकरवाडी नदी काठच्या दोन हजार नागरिकांना महापालिका शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे.

सोमवारपासून जोरदार पाऊस पडत आहे. पवना धरण शंभर टक्के भरले असून पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. पवना, मुळशी धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग केला जात आहे. रात्री १५ हजार ७७० क्युसेकने पवना धरणातून विसर्ग नदीपात्रात करण्यात आला. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. नदी काठच्या घरात पाणी शिरण्याची भीती निर्माण झाली होती. त्यासाठी नागरिकांचे स्थलांतरण करण्यात आले.

पंचशीलनगर, पिंपळे नीलख परिसरातील १४ जणांचा समावेश असलेल्या पाच कुटुंबांना जवळच्या महानगरपालिका शाळेत हलवण्यात आले आहे. ४५ जणांचा समावेश असलेल्या १२ कुटुंबांना लक्ष्मीनगर, पिंपळे गुरव परिसरातील जवळच्या महापालिका शाळेत हलवण्यात आले आहे. संजय गांधीनगर मधील अंदाजे ७५ रहिवासी सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून त्यातील ३० व्यक्ती महापालिका शाळेत स्थलांतरित झाले. इतर नातेवाईकांकडे गेले आहेत. पिंपळे निलख पंचशीलनगर २५ जण महापालिका शाळेत स्थलांतरित झाले आहेत.

चिंचवडगाव येथील माजी नगरसेवक सुरेश भोईर यांच्या कार्यालयाजवळच्या ४० जणांना काळेवाडीत स्थलांतरित करण्यात आले. रामनगर बोपखेल येथील ४० जणांना महापालिका शाळेत स्थलांतरित केले. जाधव घाट ५८, वाल्हेकर शाळवाडी शाळा दहा, किवळे स्मशानभूमी लेबर कॅम्प ५४० यांना स्थलांतरित करण्यात आले. भाट नगर परिसरातील १५० कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. मुळशी धरणातून सकाळी आठ वाजल्यापासून ३१ हजार ५०० तर पवना धरणातून १५ हजार ७७० क्युसेकने पवना धरणातून विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे.

महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी तीन शिफ्टमध्ये कार्यरत

शहर परिसरात तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. शहरातून वाहणाऱ्या पवना, मुळा, इंद्रायणी नद्यांवरील धरणामधून करण्यात येणाऱ्या विसर्गामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आयुक्त शेखर सिंह यांच्या आदेशानुसार, आपत्ती व्यवस्थापनासाठी तीन शिफ्टमध्ये आपत्कालीन कामकाज अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शिफ्टनिहाय नियुक्त करण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी

सकाळची शिफ्ट (सकाळी ६ ते दुपारी २)

  • समन्वय अधिकारी – संध्या वाघ, कार्यकारी अभियंता (संपर्क क्रमांक : ९९२२५०१७५८)
  • सहाय्यक अधिकारी – उप अभियंता विनायक माने, कनिष्ठ अभियंता चंद्रकांत कुंभार, सहाय्यक स्थापत्य अभियंता प्रफुल्ल भोकरे, मुख्य लिपिक सुनील चव्हाण, लिपिक गोविंद गर्जे

दुपारची शिफ्ट (दुपारी २ ते रात्री १०)

  • समन्वय अधिकारी – विजय भोजने, कार्यकारी अभियंता (संपर्क क्रमांक : ९९२२५०१७६८)
  • सहाय्यक अधिकारी – उप अभियंता सुनील दांगडे, कनिष्ठ अभियंता पंकज धेंडे, सहाय्यक स्थापत्य अभियंता चिन्मय कडू, मुख्य लिपिक मुरगू बोटे, लिपिक शिधाजी जाधव

रात्रीची शिफ्ट (रात्री १० ते सकाळी ६)

  • समन्वय अधिकारी – सुनील पवार, कार्यकारी अभियंता (संपर्क क्रमांक : ९९२२५०१९४८)
  • सहाय्यक अधिकारी – उप अभियंता शाम गर्जे, कनिष्ठ अभियंता राजदीप तायडे, सहाय्यक स्थापत्य अभियंता शेषेराव अटकोरे, मुख्य लिपिक भरत कोकणे, लिपिक विनायक रायते

ध्वनीक्षेपकाद्वारे नागरिकांना सूचना

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत. ज्याभागात नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन पूर परिस्थिती निर्माण होते, अशा परिसरात विशेष लक्ष ठेवले जात आहे. ध्वनीक्षेपकाद्वारे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात येत आहेत.

दरम्यान, ताम्हिणी येथे पडलेला पाऊस विक्रमी ठरला आहे. त्याबाबत भारतीय हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप म्हणाले, ताम्हिणी येथे पडलेला ५७५ मिलिमीटर पाऊस यंदाच्या मोसमातील एका दिवसात पडलेला सर्वाधिक आहे.