पुणे : शहरात झिकाचे आणखी दोन रुग्ण आढळले असून, झिकाची एकूण रुग्णसंख्या ११ वर पोहोचली आहे. या रुग्णांपैकी पाच गर्भवती आहेत. यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. याचबरोबर शहरात वेगवेगळ्या भागांत रुग्ण आढळून येऊ लागल्याने झिकाच्या संसर्गात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे.

शहरात सुरुवातीला एरंडवणे भागात झिकाचे चार रुग्ण आढळले होते. त्यापैकी दोन गर्भवती आहेत. त्यानंतर मुंढव्यातील कोद्रे वस्ती परिसरात दोन रुग्ण आढळले आणि त्यातील एक गर्भवती आहे. त्याचवेळी डहाणूकर कॉलनी, पाषाण, आंबेगाव बु. या परिसरातही रुग्ण आढळले. त्यातील पाषाण आणि आंबेगाव बुद्रुकमधील दोन रुग्ण गर्भवती आहेत. यामुळे एकूण पाच गर्भवतींना झिकाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. आता कर्वेनगर आणि खराडी परिसरात दोन जणांना झिकाचा संसर्ग झाला आहे.

हेही वाचा : मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन करताय? जागतिक आरोग्य संघटना काय म्हणतेय जाणून घ्या…

कर्वेनगरमधील एका खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या ४२ वर्षीय महिलेला झिकाची बाधा झाली आहे. तिला एक ते दोन आठवड्यांपासून ताप येत होता. त्यामुळे रुग्णालयाने तिचा रक्त आणि लघवीचा नमुना तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणुविज्ञान संस्थेत (एनआयव्ही) पाठविला होता. त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. सध्या या महिलेची प्रकृती बरी आहे. खराडीतील २२ वर्षीय तरुणालाही झिकाचा संसर्ग झाला आहे. त्याच्यात ताप आणि अंगावर लाल पुरळ अशी लक्षणे दिसून आली. त्याचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीला पाठविण्यात आले होते. त्याचा तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

हेही वाचा : अजित पवार, सुनेत्रा पवार यांनी केला विठूनामाचा गजर…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कर्वेनगर आणि खराडी भागात झिकाचे दोन रुग्ण आढळून आल आहेत. रुग्ण आढळून आलेल्या परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. डासांना प्रतिबंध करण्यासाठी धूर फवारणी केली जात आहे. याचबरोबर त्या परिसरातील गर्भवतींची तपासणीमोहीम हाती घेतली आहे.

डॉ. राजेश दिघे, सहायक आरोग्य अधिकारी, महापालिका