पुणे : कोथरूड भागात सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी १७ लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कोथरूड भागातील उजवी भुसारी काॅलनीतील एका अपार्टमेंटमध्ये राहायला आहेत. चोरट्यांनी शनिवारी (३१ मे) मध्यरात्री बंद सदनिकेचे कुलूप तोडले.

शयनगृहातील कपाट उचकटून सोने-चांदीचे दागिने, तसेच हिरेजडीत दागिने असा १७ लाख २० हजार रुपयांचा ऐवज लांबवून चोरटा पसार झाला. शनिवारी सायंकाळी सदनिकेचे कुलूप तोडून ऐवज लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. सहायक पोलीस आयुक्त अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी घटनास्थळी भेट दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पसार झालेल्या चोरट्यांचा पोलिसांकडून माग काढण्यात येत आहे. अपार्टमेंट परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी तपासले असून, सहायक पोलीस निरीक्षक बालाजी सानप तपास करत आहेत. कोथरूड भागातील सोलोरिस क्लबजवळ असलेल्या बंगल्यातून चंदनाचे झाड कापून नेल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली होती.