पुणे : सतरा लाख रुपयांच्या खंडणीसाठी शहरातील दोन महिलांचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उत्तमनगर परिसरात घडली, गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने तपास करुन गुंडासह साथीदारांना अटक केली. गुंडांच्या तावडीतून दोन महिलांची सुटका करण्यात आाली. बाबुलाल लक्ष्मण मोहोळ (वय ४५, सरडे बाग, उत्तमनगर ), अमर नंदकुमार मोहिते (वय ३९, रा. गणेश नगर ), प्रदीप प्रभाकर नलवडे (वय ३८, रा. भूगाव)स अक्षय मारूती फड (वय २४, रा. वारजे) अशी अटक करण्यात आलेल्या गुंडांची नावे आहेत. उत्तम नगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी मोहोळ आणि साथीदारांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. गुंड शरद मोहोळ याच्या टोळीला बाबुलाल शस्त्रे पुरवायचा, अशी माहिती पोलिसांनी दिली. याबाबत एका महिलेने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिलेने व तिच्या मैत्रिणींनी पुणे स्टेशन परिसरात स्टॉल मिळून देतो असे सांगून आरोपी बाबुलालकडून रोख रक्कम घेतली होती. मात्र, स्टॉल न मिळाल्याने बाबुलाल आणि त्याच्या साथीदारांनी कात्रज आणि वारजे परिसरातून दोन महिलांचे अपहरण करून त्यांना डांबून ठेवले होते. त्यानंतर आरोपींनी या महिलांच्या घरी फोन करून १७ लाख रुपये खंडणीची मागणी केली. पैसे न दिल्यास त्यांना ठार मारण्याची धमकीही देण्यात आली.

हेही वाचा : एल्गार परिषदेच्या आयोजक हर्षाली पोतदार यांनी कोरेगाव भीमा आयोगासमोर उलटतपासणीत दिली ‘ही’ माहिती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेच्या मुलाने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. महिलांना उत्तम नगर परिसरातील आरोपींच्या घरात डांबून ठेवल्याची माहिती खंडणीविरोधी पथकाच्या पोलिसांना मिळाली. पोलीस उपायुक्त अमोल तांबे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, विजय गुरव, प्रदीप शितोळे, विनोद साळुंखे, सुरेंद्र जगदाळे, राहुल उत्तरकर, शंकर संपत्ते, संग्राम शिनगारे, सचिन अहिवळे, आशा कोळेकर आदींनी ही कारवाई केली. आरोपींनी महिलांना धक्काबुक्की केल्याने त्यांना मुका मार लागल्याचे प्राथमिक तपासणीत आढळून आले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.